तापमानात वाढ; फळबागांचे अस्तित्व धोक्यात!
By Admin | Updated: February 2, 2016 01:57 IST2016-02-02T01:57:43+5:302016-02-02T01:57:43+5:30
वाशिम जिल्हय़ात विविध रोगांचा प्रादुर्भाव.

तापमानात वाढ; फळबागांचे अस्तित्व धोक्यात!
वाशिम: गत तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्यामुळे फळबागांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हय़ात मंगरूळपीर, मानोर्यासह अन्य तालुक्यांमध्ये डाळिंब, केळी, संत्रा, पपईच्या फळबागा आहेत. ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतकर्यांनी हजारो हेक्टरवर या झाडांची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आधीच पाण्याअभावी फळबागा संकटात सापडल्या होत्या. यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी पडला. तसेच थंडीही पडली नाही. त्यातच गत तीन ते चार दिवसांपासून तापमानात अचानक वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंंत नेहमी थंड वातावरण असते; मात्र यावर्षी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातच तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. सध्या दिवसा ३५ डिग्री सेल्सिअस तर रात्री १५ डिग्री सेल्सिअस तापमान आहे. गत आठ दिवसात दिवसाच्या तापमानात सात ते आठ डिग्रीने वाढ झाली आहे. त्यामुळे संत्रा, डाळिंब यासारख्या फळांवर विविध किडींचे व रोगांचे आक्रमण होण्याची शक्यता आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे फळांचा आकार कमी होणार आहे. तापमान जास्त असले तर फळांचा आकार वाढत नाही. तसेच उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे. यासोबत फळांना भेगा पडण्याला सुरुवात झाली आहे. डाळिंब व संत्रासारख्या फळांना तापमानात वाढ झाली तर भेगा पडतात. त्यामुळे फळातील रस कमी होऊन फळे सुकतात. तसेच फळांवर डागही पडतात. त्यामुळे फळे खराब होतात व बाजारात ग्राहक खरेदी करीत नाहीत. या वाढत्या तापमानामुळे फळबागाधारक शेतकरी त्रस्त झाले असून, यावर्षी त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. आधीच तीन वर्षांंंपासून सातत्याने कमी पाऊस पडत असल्यामुळे फळबागा सुकल्या आहेत. अनेक शेतकर्यांनी संत्रा व केळीच्या बागा कापल्या आहेत. यावर्षी आणखी फळबागा कमी होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील जिल्हय़ातील गहू व हरभरा हे मुख्य पीक आहे. हजारो हेक्टरवर याची पेरणी करण्यात आली आहे; मात्र तापमानात वाढ झाल्यामुळे ही पिकेही धोक्यात आली आहे. सध्या हरभरा व गहू हे दाणे भरण्याच्या स्थितीत आहे; मात्र थंडी गायब झाल्याने दाणे भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असून, दाणे बारीक होतात. परिणामी बाजारात विक्रीला गेल्यावर चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.