निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा ?; दुकाने हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST2021-07-23T04:25:27+5:302021-07-23T04:25:27+5:30
वाशिम : कोरोना संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. यामध्ये दुकाने बंद करण्याची वेळ ४ वाजता ...

निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा ?; दुकाने हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद !
वाशिम : कोरोना संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. यामध्ये दुकाने बंद करण्याची वेळ ४ वाजता ठेवण्यात आली आहे. तरी सुद्धा वाशिम शहरातील दुकानांमधून हवे ते मिळत असल्याचे २२ जुलै राेजी ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.
दुकाने बंद करण्यासाठी पाेलीस विभागाचे वाहन फिरत असताना थाेड्यावेळपर्यंत दुकानाचे शटरखाली ओढायचे व नंतर पुन्हा उघडायचा प्रकार शहरात दिसून आला.
............
या दुकानांवर लक्ष कोणाचे ?
वाशिम शहरातील पाटणी चाैक, रिसाेड रस्त्यावरील कमर्शियल काॅम्पलेक्समधील दुकाने ४ वाजता बंद करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. ४ वाजतानंतर पाेलीस विभागाचे कर्मचारी फिरताना दिसताहेत. याकरिता जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकार नगर परिषदेला दिले आहेत. तरी काही दुकाने अर्धशटर उघडे दिसून येत आहेत.
.....
दुकानाबाहेर व्यक्ती ग्राहकांना विचारताेय काय हवे?
काेराेना संसर्ग पाहता ४ वाजता दुकाने बंद करण्याची लगबग व्यावसायिकांमध्ये दिसून येते, परंतु काही दुकानाबाहेर एक व्यक्ती उभा राहून काय हवे याची विचारणा करून साहित्य देत असल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येत आहे. पाेलिसांचे वाहन ४ वाजतापासून शहरात सायरन वाजवत फिरत असताना दुकाने बंद करण्याची लगबग काही दुकानदार दाखवितात. गाडी पुढे निघून गेल्याबराेबर पुन्हा दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याचे गुरुवारी लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.
.......
हे घ्या पुरावे...!
कमर्शियल काॅम्प्लेक्स
वाशिम येथील रिसाेड रस्त्यावर असलेल्या कमर्शियल काॅम्पलेक्समध्ये एक चहाची दुकान अर्धशटर बंद करुन चालविण्यात येत असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.
....
रिसाेड नाका
वाशिम येथील पाटणी चाैकनजीक असलेल्या रिसाेड नाकास्थित एक कापडाचे दुकान चक्क ५.२२ मिनिटांनीही अर्धशटर उघडे दिसून आले. यामध्ये काही ग्राहक असल्याने हे दुकान उघडे हाेते.
....
काेराेना संसर्ग अद्याप संपला नाही तर कमी झाला आहे. याकरिताच प्रशासनाने काही नियम लावून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन हाेत असेल तर उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल.
- शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम