पार्डी टकमोर येथील तलाठी गावंडे निलंबित
By Admin | Updated: March 15, 2015 00:56 IST2015-03-15T00:56:35+5:302015-03-15T00:56:35+5:30
शेतक-यांना केली होती पैशाची मागणी.

पार्डी टकमोर येथील तलाठी गावंडे निलंबित
वाशिम : तालुक्यातील पार्डी टकमोर येथील तलाठी व्ही.व्ही. गावंडे यांना मदत वाटपाचे धनादेश देण्याकरिता शेतकर्यांना पैशाची मागणी करणे यासह विविध कारणांवरून १३ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांनी निलंबित केले.
तहसीलदार वाशिम यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार पार्डीटकमोर येथील तलाठी व्ही.व्ही. गावंडे हे मुख्यालयी विना परवानगीने गैरहजर राहणे व वेळेवर कधीही साझ्यावर हजर नसणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे , शासकीय कामात दुर्लक्ष करणे व निष्काळजीपणा दाखविणे. मदत वाटपाचे धनादेश देण्याकरिता शेतकर्यांना पैशाची मागणी करणे, पर्जन्यमानाची आकडेवारी न कळविणे तसेच शासकीय कामावर दारू पिवुन हजर राहणे. यावरून तलाठी गावंडे पार्डी टकमोर यांनी कामचुकारपणा केला असून, कर्तव्यात कसुर केला आहे. त्यांना सेवेत कार्यरत ठेवणे शक्य नाही, अशी माझी खात्री असून, उक्त गैरवर्तनामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम (२) (३) चे उल्लंघन झाले असल्याचे पत्र उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांना ४ फेब्रुवारी रोजी सादर केले होते. यावरून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९ चे नियम ४ (१) (अ) अन्वये व्ही.व्ही.गावंडे तलाठी पार्डी टकमोर ता.वाशिम यांना उपविभागीय अधिकारी यांनी एका आदेशाव्दारे निलंबित केले. तलाठी गावंडे यांचे निलंबन काळात मुख्यालय, तहसील कार्यालय रिसोड निश्चित करण्यात आले आहे; तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ चे नियम ६८ मधील तरतुदीनुसार निलंबन निर्वाह भत्ता व इतर भत्ते अनुट्ठोय राहील.