बोगस खत, बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा!
By Admin | Updated: April 20, 2016 02:08 IST2016-04-20T02:08:58+5:302016-04-20T02:08:58+5:30
वाशिम येथे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कठोर कारवाई करण्याची पालकमंत्र्यांची सूचना.

बोगस खत, बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा!
वाशिम: यंदा मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठय़ा प्रमाणात पेरणी होणार असून, शेतकर्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावे. खत व बियाण्यात शेतकर्यांची फसगत करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा, जलयुक्त शिवार अभियान व पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनाली जोगदंड, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, विभागीय कृषी सहसंचालक सिद्धोधन सरदार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उ पविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. संदीपान सानप, डॉ. शरद जावळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नीलेश राठोड, सर्व तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
खरीप हंगामाचा आढावा घेताना डॉ. पाटील यांनी कृषी सेवा केंद्रांकडून शेतकर्यांची फसगत होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. बियाणे किंवा खतांची विक्री करताना लिंकिंगच्या नावाखाली अनावश्यक बाबी शेतकर्यांच्या माथी मारल्या जातात. यंदाच्या खरीप हंगामात असे प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना बियाणे, खते व कीटकनाशकांचा उपलब्ध साठा, त्याची किंमत दर्शविणारा फलक दुकानाबाहेर लावण्याची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. अनेक वेळा बियाणे खरेदी कर ताना शेतकर्यांची फसवणूक होते, त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व बियाणे विक्री केंद्रांमध्ये जाऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बियाण्यांची तपासणी करावी. बियाणे, खते यांची साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्र त्येक तालुक्यात कृषी विभागामार्फत विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचनाही पालकमंत्री डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.