अर्ज करूनही मिळेना ‘स्वाइप मशीन’!
By Admin | Updated: April 20, 2017 02:02 IST2017-04-20T02:02:25+5:302017-04-20T02:02:25+5:30
बँकांकडे हजारो अर्ज ‘पेंडिंग’ : ‘कॅशलेस’ धोरणाचा जिल्ह्यात उडाला बोजवारा; प्रशासनाचेही दुर्लक्ष

अर्ज करूनही मिळेना ‘स्वाइप मशीन’!
वाशिम : जिल्ह्यातील शेकडो व्यापाऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडे ‘स्वाईप मशीन’ची मागणी करणारे अर्ज सादर केले; मात्र वारंवार बँकांचे उंबरठे झिजवूनही ही मशीन मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, शासन स्तरावरून अंगिकारण्यात आलेल्या ‘कॅशलेस’ धोरणाचा बँकांच्या उदासीनतेमुळेच बोजवारा उडत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये चलनातून ५०० व हजारच्या नोटांवर बंदी लादली. त्यानंतरच्या काळात ‘कॅशलेस’ धोरण अंगिकारण्याबाबत युद्धस्तरावर जनजागृती देखील करण्यात आली. मात्र, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्यासह पुरेशा सुविधा पुरविण्याकामी शासन, प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले आहे.
वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या शहरांसह अनसिंग, शिरपूरसारख्या मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांनी डिसेंबर २०१६ पासून त्यांचे खाते असणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांकडे ‘स्वाइप मशीन’ मिळणेबाबत अर्ज सादर केलेले आहेत; मात्र पाच महिने उलटूनही जिल्ह्याकरिता ‘स्वाइप मशीन’ उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. एकट्या वाशिम शहरातील पाटणी चौकात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ८०० पेक्षा अधिक ‘स्वाइप मशीन’ची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यात आजमितीस उण्यापुऱ्या ३५ ते ४० मशीन कार्यान्वित झाल्या आहेत. या गंभीर बाबीमुळे ‘कॅशलेस’ धोरणाचा पूर्णत: बट्ट्याबोळ उडाला असून, व्यावसायिकांमधून याप्रती नाराजीचा सूर उमटत आहे.
‘एटीएम’मध्ये ठणठणाट; व्यापाऱ्यांच्या ‘ट्रान्झेक्शन’वर बँकांचा कारभार!
जिल्ह्यात विविध ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकांचे तब्बल ६२ ‘एटीएम’ कार्यान्वित आहेत; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यातील बहुतांश ‘एटीएम’मध्ये पैशांचा ठणठणाट असून, ही विदारक परिस्थिती आजही कायम आहे. बँकांमधील व्यवहार बंद झाल्यानंतर ऐनवेळी पैशांची निकड भासल्यास नागरिक ‘एटीएम’वर धाव घेत आहेत; परंतु परिसरातील सर्व एटीएम पिंजून काढल्यानंतरही कुठेच पैसे मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे ‘एटीएम’बंदच्या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना बँकांमध्येही अपेक्षित रकमांचा विड्रॉल दिला जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ‘आरबीआय’कडूनच पुरेशा प्रमाणात ‘कॅश’ मिळत नसल्यामुळे ही समस्या भेडसावत असल्याचे काही बँकांच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत अधिकांश राष्ट्रीयीकृत बँका स्थानिक पातळीवरील व्यापाऱ्यांच्या दैनंदिन ‘ट्रान्झेक्शन’वरच आपला कारभार पाहत असल्याचे दिसून येत आहे.
व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये लागणाऱ्या ‘स्वाइप मशीन’चा वरिष्ठ पातळीवरूनच पुरवठा नसल्यामुळे बँकादेखील हतबल झाल्या आहेत; परंतु लवकरच हा प्रश्न निकाली निघून व्यावसायिकांना पुरेशा प्रमाणात मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्ह्यातील ७७४ राशन दुकाने व १३८१ केरोसिन विक्रेत्याही ‘स्वाइप मशीन’ देण्याचे नियोजन आहे.
- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम