पिण्याच्या पाण्याचा तुटवडा अन् वैद्यकांची कमतरता कायम
By Admin | Updated: September 1, 2014 23:29 IST2014-09-01T23:29:42+5:302014-09-01T23:29:42+5:30
दोन महिन्यांपासून शिबिरच नाही : वैद्यकीय अधीक्षकांचे पद रिक्तच

पिण्याच्या पाण्याचा तुटवडा अन् वैद्यकांची कमतरता कायम
अनसिंग : ज्याच्या हाती संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाचा कारभार असतो ते पदच रिक्त असल्याने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या दोन महिण्यापासून या रुग्णालयात एकही कँप केवळ वैद्यकांच्या कमतरतेपायी घेतला गेला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अनसिंगचे प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे गेल्याने अनसिंगला ग्रामीण रुग्णालय कार्यान्वीत करण्यात आले. साहजिकच ग्रामीण रुग्णालय दिल्यामुळे आरोग्य सेवा अधिक चांगल्याप्रकारे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यान्वीततेपासून या परिसरातील रुग्णांच्या अपेक्षांना पुरता तडा गेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मुलभूत सुविधा तर सोडाच पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय की प्राथमिक आरोग्य केंद्र असा प्रश्न परिसरातील जनता उपस्थित करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यान्वीततेपेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रच बरे होते, अशा प्रतिक्रिया आता जनता व्यक्त करीत आहे. अनसिंगच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांचे पद गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहे. वैद्यकीय अधिकार्यांची चार पदे असतांना केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णसेवेचा ताण व सोयीसुविधांच्या अभावात सांभाळण्याची पाळी कार्यरत वैद्यकीय अधिकार्यावर दोन महिण्यांपासून आली आहे. या ठिकाणचा तात्पुरता चार्ज डॉ.आशिष मारकड यांच्याकडे देण्यात आला आहे. रुग्णालयात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. या ठिकाणी लावण्यात आलेले फिल्टर शोभेचे वास्तु बनले आहे. रुग्णांना पिण्यासाठी तथा वापरण्यासाठी पाणी आणण्याकरिता हॉटेल तथा विहीरींचा आधार घ्यावा लागत आहे. रुग्णांना आवश्यक असणारे पंखे बंद आहेत. शौचालय नादुरूस्त असून शौचासाठी रुग्णांना उघडयावर जावे लागते. एकीकडे शौचालयासाठी जागर अन दूसरीकडे शासनाच्याच रुग्णालयातील शौचालय बंद , ही विसंगती अनसिंग येथे पाहावयास मिळत आहे. शौचालय बांधलेले असून पाण्याअभावी त्याचा वापर बंद आहे. पावसाळ्य़ाच्या दिवसात पसरु शकणारी रोगराई पाहता अनसिंग व परिसरातील जनतेच्या आरोग्य सोयीसाठी अनसिंगच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकांची नियुक्ती तातडीने करुन सुविधांची तातडीने पूर्तता करण्याची मागणी जनतेतून होत आहे.