रिसोडचे मुख्याधिकारी पानझाडे निलंबित
By Admin | Updated: April 19, 2016 02:22 IST2016-04-19T02:22:22+5:302016-04-19T02:22:22+5:30
व्यापारी कल्पेश वर्मा आत्महत्या प्रकरण;जामीन मिळाला!

रिसोडचे मुख्याधिकारी पानझाडे निलंबित
रिसोड: रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. रिसोड येथील युवा व्यापारी कल्पेश वर्मा आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना जामीन मिळाला. रिसोड येथील युवा व्यापारी कल्पेश वर्मा यांनी ७ एप्रिल २0१६ रोजी रात्री स्वत:च्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी कल्पेश वर्मा यांच्या हातामध्ये एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली. या चिठ्ठीत त्यांनी काही जणांची नावे लिहून ठेवली होती, त्यामुळे युवा व्यापारी वर्गामध्ये मोठा हादरा बसला आहे. या आत्महत्येप्रकरणी नगरसेविका मीना अग्रवाल, अशोक अग्रवाल, सुनील बगडिया व मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३0६, ३४ अ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुख्याधिकारी पानझाडे यांना अटक करून १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायाधिशांनी पानझाडे यांना १८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी चार व्यक्तींवर रिसोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना अटक केली असून, अद्यापही तिघे आरोपी फरार आहेत. या प्रकरणात फरार आरोपींना केव्हा अटक करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.