रिसोड नगर परिषदेच्या कर विभागातील लिपिक निलंबित
By Admin | Updated: November 9, 2014 01:11 IST2014-11-09T01:11:30+5:302014-11-09T01:11:30+5:30
कराची वसुली करून फंडात भरलीच नाही.

रिसोड नगर परिषदेच्या कर विभागातील लिपिक निलंबित
रिसोड(वाशिम): येथील नगर परिषदेच्या कर विभागातील वसुली कर्मचार्यांनी नागरिकांकडून वसूल केलेल्या मालमत्ता व इतर कराची वसुली करून नगर परिषद फंडात न भरता स्वहितासाठी वापरुन लाखो रुपयांचा अपहार केल्याचे वृत्त बुधवार, ५ रोजी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच नगर परिषद प्रशासन खडबडून जागी झाले. कर विभागात केलेल्या सखोल चौकशीअंती अखेर कर विभागातील लिपिक इरशादोद्दीन इसाकोद्दीन यास दोषी ठरवित मुख्याधिकारी दीपक इंगोले यांनी निलंबित केले. निलंबनाचा आदेश शुक्रवार, ६ रोजी पारित करण्यात आला.
मुख्याधिकार्यांनी दिलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, कर विभागातील लिपिक इरशादोद्दीन इसाकोद्दीन यांनी शहरातील मालमत्ता व इतर कर वसुली करुन न.प.फंडात वेळेवर न भरल्याने आर्थिक अनियमितता झाली आहे. इरशादोद्दीन इसाकोद्दीन यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नगर परिषद व नगर पंचायती अधिनियम १९६५ चे कलम ७९(१) सह नुसार निलंबित करण्यात आले आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास लेखासंहिता अधिनियम १९७१ चे कलम ५५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही मुख्याधिकारी दीपक इंगोले यांनी संबंधित कर्मचार्यास दिलेल्या निलंबन आदेशात दिले आहे. गत चार महिन्यांपासून नगर परिषदेच्या कर विभागातील सुरु असलेल्या अर्थपूर्ण सावळय़ा गोंधळाची माहिती लोकमत प्रतिनिधीला मिळताच कर विभागात झालेला लाखो रुपयाचा अपहार लोकमतच्या वृत्ताने चव्हाट्यावर आणला. या वृत्ताने पालिका वर्तृळासह प्रशासनात एकच खळबळ उडाली. विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार कर विभागात झालेल्या आर्थिक अपहाराची गंभीर दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली व तातडीने मुख्याधिकारी यांना केलेल्या सुचनेवरुन ही कारवाई झाल्याचे बोलल्या जाते. कर विभागासह इतरही विभागात पालिका प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घातल्यास अनेक गैर आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास येऊ शकतात, अशी चर्चा नगर परिषदेच्या कर्मचारी वर्ग खासगीत बोलून दाखवितात.