उन्हाळी भुईमुगाची आवक वाढली, भाव घसरले
By Admin | Updated: May 27, 2017 19:37 IST2017-05-27T19:37:22+5:302017-05-27T19:37:22+5:30
उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात; शेतकरी निराश

उन्हाळी भुईमुगाची आवक वाढली, भाव घसरले
वाशिम: उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात असून, यंदा या पिकाचे उत्पादन ब-यापैकी झाल्याने बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे दिसत आहे. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वाणालाही खुप कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
यंदा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाचा पेरा दुप्पट झाला होता. गतवर्षी ३ हजार ३७४ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. ते प्रमाण यंदा ६ हजार हेक्टरच्यावर गेले होते. त्यातच पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांना या पिकाचे एकराला सरासरी पाच क्विंटल उत्पादन झाले. त्यामुळे तूर आणि सोयाबीनमध्ये फटका खाणारे शेतकरी उत्साही होते; परंतु त्या उत्साहावरही बाजार व्यवस्थेने विरजन घातले आहे. मागील वर्षी प्रति क्विंटल ५ हजार ८०० रुपयांपर्यंत विकला जाणारा भुईमूग यंदा कमाल ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ३ हजार ९०० रुपये क्विंटलने घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत. दरम्यान, खरीपाचा हंगाम तोंडावर आला असल्याने या हंगामासाठी हाती पैसा असावा म्हणून शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने घरात साठवलेले धान्य विकण्याची तयारी केली असून, नुकत्याच काढलेल्या भुईमुगाची विक्रीही करण्याची घाई त्यांना झाली आहे. त्यामुळे बाजारात भुईमुगाची आवक वाढली आहे. एकट्या कारंजा येथील बाजार समितीमध्ये २६ मे रोजी तब्बल पाच हजार क्विंटल भुईमुगाची आवक झाली होती.