देगावात शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: October 18, 2014 01:17 IST2014-10-18T01:13:41+5:302014-10-18T01:17:03+5:30
नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून देगाव येथील शेतक-याची आत्महत्या.

देगावात शेतक-याची आत्महत्या
देपुळ (वाशिम) : मनक्याचा त्रास, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून देगाव येथील शेतकरी कैलास देवीसिंह चव्हाण (४५) यांनी १६ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी अनसिंग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कैलास चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवसाअगोदर सोयाबीन काढले. त्यांना १ हेक्टर ५२ आर जमिनीमध्ये केवळ दोन क्विंटल सोयाबीन झाले. परिणामी, चव्हाण मानसिकरीत्या खचले. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
चव्हाण यांच्याकडे अनसिंग येथील सेंट्रल बँकचे १ लाख १७ हजार रुपयाचे थकित कर्ज तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज आहे. नापिकी व कर्जबाजारीपणातून त्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे बोलले जात असून, त्याला चव्हाण यांच्या खिशात सापडलेल्या मृत्युपूर्व चिठ्ठीने दुजोरा दिला आहे. मला मणक्याचा त्रास आहे, शिवाय माझ्यावर विविध बँकेचे कर्ज आहे. नापिकी व कर्जाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. चव्हाण यांच्या पाठीमागे दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.