विद्यार्थ्यांच्या दारी ‘तहसील’

By Admin | Updated: August 12, 2014 00:17 IST2014-08-11T23:27:00+5:302014-08-12T00:17:36+5:30

वाशिम तहसील कार्यालयाचा पुढाकार : जनजागृती मोहिमेला वेग

Students 'tahsil' | विद्यार्थ्यांच्या दारी ‘तहसील’

विद्यार्थ्यांच्या दारी ‘तहसील’

वाशिम : विविध कागदपत्रांसाठीच्या धावपळीतून होणारा मानसिक व आर्थिक ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी आर.जी. कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार यांच्या मार्गदर्शनात प्रमाणपत्र वितरण कॅम्पची आखणी केली आहे. नऊ मंडळातील प्रत्येक शाळांमध्ये विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र वितरणाचा श्रीगणेशा १६ ऑगस्टपासून केला जाणार आहे. शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. एकाच वेळी विद्यार्थी व पालक सेतू तसेच तहसील कार्यालयाचा धावा करीत असल्याने नियोजनच कोलमडून जाते. परिणामी, विद्यार्थी, पालकांबरोबरच प्रशासनालादेखील गैरसोयींचा सामना करावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानात विविध उपक्रमांची तरतूद केली आहे. याअनुषंगाने वाशिम तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कुलकर्णी व उपविभागीय अधिकारी अमनकार यांच्या मार्गदर्शनात तसेच शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक संघ, महा-ई सेवा केंद्र, पंचायत समितीच्या सहकार्यातून ऑगस्ट ते डिसेंबर २0१३ या दरम्यानचा महसूल मंडळ व शाळानिहाय पहिला व तिसरा शनिवार या दिवशी घेण्यात येणार वितरण कार्यक्रम निश्‍चित केला आहे. इयत्ता ८ ते १२ वीच्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्येच जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलेअर, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले वाटप तसेच इयत्ता ८ ते १२ वीच्या शालेय विद्यार्थ्यांचे आम आदमी विमा योजना अंतर्गत शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज महा ई सेवा केंद्रामार्फत भरुन घेण्यात येणार आहे. या उपक्रमांची माहिती तसेच विविध दाखल्यांकरिता लागणारी प्रमाणपत्रांची माहिती व यादी मुख्याध्यापकांना देण्यात आली. संबंधीत गावाच्या तलाठय़ाची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून इयत्ता ८ ते १२ च्या शाळामध्ये विद्यार्थी, पालकांकडून अर्ज भरुन घेणे, प्रमाणपत्र तयार करणे, विद्यार्थ्यांचे आम आदमी विमा योजना शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन घेणे इत्यादी कामाकरिता जवळच्याच विविध महा ई सेवा केंद्राची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रमाणपत्र वितरण कॅम्पच्या दिवशी शाळेमध्ये मुख्याध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, उपस्थित राहणार असल्यामुळे विविध दाखल्याकरिता करावी लागणारी कसरत कमी होणार आहे. १६ ऑगस्टपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. सदर कार्यक्रमाचे नियंत्रण तथा पर्यवेक्षक उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर, तहसीलदार आशिष बिजवल, निवासी नायब तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार विजय खेडकर, सखाराम तांदळे, डॉ. सारिका भगत हे करणार आहेत.

Web Title: Students 'tahsil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.