वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठीच संघर्ष यात्रा
By Admin | Updated: August 31, 2014 01:52 IST2014-08-31T01:48:41+5:302014-08-31T01:52:57+5:30
मालेगाव येथे पंकजा मुंडे यांची जाहीर सभा.

वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठीच संघर्ष यात्रा
मालेगाव : कष्टकरी आणि बहूजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले वडील स्व. गोपिनाथराव मुंडे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. आपल्या वडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करावा लागला. त्याच मार्गावरुन मार्गक्रमण करत आपल्या वडिलांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी, स्वाभिमानी कार्यकर्त्याची फौज जोडण्यासाठीच आपण संघर्षयात्रा काढल्याचे प्रतिपादन भारतिय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे/पालवे यांनी केले. त्या मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजीत जाहीर सभेला संबोधीत करीत होत्या.
सभेला खासदार संजय धोत्रे, आमदार रणजित पाटील, तेजराव पाटील थोरात, आकाश फुंडकर, सुरजसिंह ठाकूर, विजयराव जाधव, श्याम बढे, डॉ.विवेक माने, सुरेश लूंगे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,आपल्या वडिलांच्या जाण्याचे दु:ख आमच्या परिवारापेक्षाही जास्त महाराष्ट्रातील जनतेला झाले आहे. महाराष्ट्रात शोषित उपेक्षीत कष्टकरी जनतेची सत्ता स्थापन करावयाचे स्वप्न आपल्या वडिलांनी पाहिले होते. त्या स्वप्नाची पुर्तता करण्यासाठीच आपण संघर्ष यात्रेच्या निमीत्ताने बाहेर पडली आहे. मॉ जिजाऊंचे शौर्य, सावित्रीबाईचे धैर्य अन् अहिल्यादेवी होळकरांचे औदार्य जनसामान्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असल्याचे भावोत्कट उद्गार काढत आमदार पंकजा मुंडेंनी आपल्या वडिलांनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी यात्रा काढून राज्यात परिवर्तन घडविले होते. त्याचीच पुनारावृत्ती आपल्याही संघर्षयात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळीही घडणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जाहीर सभेला भाजपाच्या तमाम शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह जनसामान्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.सभेचे संचालन व आभार प्रदर्शन मोहन बळी यांनी केले.