जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:41 IST2021-04-24T04:41:40+5:302021-04-24T04:41:40+5:30

वाशिम : जिल्ह्यात संचारबंदीची नवीन नियमावली २२ एप्रिल रोजीच्या रात्री ८ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण ...

Strictly enforce curfew in the district | जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा

जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करा

वाशिम : जिल्ह्यात संचारबंदीची नवीन नियमावली २२ एप्रिल रोजीच्या रात्री ८ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी या नियमावलीची शहरी व ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असून, सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शुक्रवारी दिले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा सभेत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर हे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, गर्दी रोखणे हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यातील वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी संचारबंदी नियमाची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अत्यावश्यक बाबींची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. मात्र, या कालावधीतसुद्धा कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदर दुकाने, आस्थापनांच्या बाहेर यासाठी योग्य व्यवस्था करावी. शहरी व ग्रामीण भागात विशेष पथके तयार करून सकाळी ११ वाजेनंतर सुरू राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी.

शहरी व ग्रामीण भागातील फळे, भाजीपाला विक्रीसाठी विकेंद्रित ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून संचारबंदी नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातसुद्धा नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. पुढील १५ दिवस जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने व अतिशय सतर्क राहून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पंत म्हणाल्या, ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी नियमांची ग्रामीण भागात कडक अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागातसुद्धा बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यावर विशेष भर द्यावा.

निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी संचारबंदीच्या नवीन नियमावलीविषयी माहिती दिली. तसेच या नियमांच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या सद्य:स्थितीची माहिती देऊन कोरोना चाचण्या वाढविणे व लसीकरण मोहिमेला गती देण्याविषयी मार्गदर्शन केले.

Web Title: Strictly enforce curfew in the district