खरीप हंगामातील तयारीला कडक निर्बंधाचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST2021-05-12T04:42:10+5:302021-05-12T04:42:10+5:30
मागील वर्षापासून सुरू झालेले कोरोना संकट थांबायला तयार नाही. सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून, शेतीविषयक कामे उरकून पीक ...

खरीप हंगामातील तयारीला कडक निर्बंधाचा अडसर
मागील वर्षापासून सुरू झालेले कोरोना संकट थांबायला तयार नाही. सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून, शेतीविषयक कामे उरकून पीक कर्ज, उसनवारी कर्ज यासारखे व्यवहार आणि यासोबतच बाजारपेठेत जाऊन खरीप हंगामाकरिता बी-बियाणे, खते आदी तयारीला शेतकरी महत्त्व देतात; परंतु कोरोनामुळे खरिपाच्या तयारीवर मोठा परिणाम होत आहे. कडक निर्बंध काळात बँकेच्या वेळा मर्यादित आहेत. बँकांना लागणाऱ्या कागदपत्रांकरिता कार्यालयात जाणे, तिथे सध्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असणे, यामुळे तोंडावर आलेल्या खरीप पेरणीच नियोजन कसे करावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच नापिकी व दुष्काळामुळे आर्थिक संकट असल्याने काय करावे? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे. पेरणीचे दिवस जवळजवळ येत आहेत. खरिपाचा हंगाम हातातून गेल्यास कुटुंबाचा भविष्यात उदरनिर्वाह कसा करायचा, या चिंतेत शेतकरी जीवन जगत आहेत. शासनाने यासंदर्भात कृषी निविष्ठा वेळेत सूट देऊन सर्वतोपरी आर्थिक मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.