प्रचारतोफा थंडावल्या
By Admin | Updated: October 14, 2014 01:53 IST2014-10-14T01:53:07+5:302014-10-14T01:53:07+5:30
वाहनांवरील भोंगे काढले : पोस्टर, बॅनरही गुंडाळले

प्रचारतोफा थंडावल्या
वाशिम : विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर आग ओकणार्या प्रचारतोफा अखेर आदर्श आचारसंहितेमुळे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ नंतर थंडावल्या आहेत. निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास बाकी असताना उमेदवारांना प्रचार थांबवावा लागत असतो. यामुळे गत १४ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी शांत झाल्या. जिल्ह्यात वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या या आखाड्यात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारिप-बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष आदी पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. तिन्ही मतदारसंघांमध्ये निकराच्या झुंजी आहेत. प्रमुख पक्षांच्या स्टार प्रचारकांनी जाहीर सभांद्वारे राजकीय वातावरण अधिक तापविण्याचे काम केले आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा पार पडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते अजित पवार यांची सभा झाली. भारिप-बमसचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे प्रा. नितीन पाटील बानगुडे, सिनेअभिनेता भारत गणेशपुरे, मनसेचे नवीन आचार्य आदींच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी जाहीर सभा पार पडल्या.