शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको!
By Admin | Updated: March 12, 2017 01:50 IST2017-03-12T01:50:32+5:302017-03-12T01:50:32+5:30
ठिकठिकाणची वाहतूक ठप्प; प्रशासनावर अतिरिक्त ताण.

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको!
वाशिम, दि. ११- शेतकर्यांना शासनाने विनाविलंब कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने शनिवार, ११ मार्च रोजी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन केले.
मंगरुळपीर: जगाचा पोशिंदा म्हणविणारा शेतकरी विद्यमान शासनाच्या उदासीनतेमुळे देशोधडीला लागला आहे. तथापि, शेतकर्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा पूर्णत: कोरा करावा, या मागणीसाठी येथील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांंनी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
शेतकर्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, नाफेडमध्ये शेतकर्यांची पिळवणूक होत आहे. अशा अनेक समस्यांनी शेतकरी ग्रासले आहेत. शेतकर्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा झाल्यास अनेक समस्या कमी होऊन शेतकरी चांगले जीवन जगू शकतील, असे निवेदन यावेळी शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले. आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेश पाटील, शहरप्रमुख विवेक नाकाडे, जि.प. सदस्य विश्वास गोदमले, पं.स. सदस्य सुभाष शिंदे, सूरज करे, युवा सेनेचे जुबेर मोहनावाले, सुनील कुर्वे, अण्णा चौधरी, संदीपान भगत, पुरुषोत्तम भुजाडे, राजू आमटे, पं.स. सदस्य संतोष इंगळेसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.