शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:43+5:302021-06-04T04:31:43+5:30
रिसोड : पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असून, त्याचेही जिल्हास्तरावर रेकाॅर्ड उपलब्ध नाही. ...

शेतकऱ्यांची लूट थांबवा, अन्यथा आंदोलन
रिसोड : पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ १७ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असून, त्याचेही जिल्हास्तरावर रेकाॅर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू असून ती तत्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णुपंत भुतेकर यांनी दिला आहे.
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ७०१ शेतकऱ्यांच्या खात्यातून पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आली. त्यात केंद्र व राज्य शासनाने आपापला हिस्सा मिळवून एकत्रित १०६ कोटी ३८ लाख ७७ हजार ३९ रुपयांची रक्कम पीक विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आली. त्यापैकी केवळ १७ कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दिल्याचे विमा कंपनी व कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना वितरित केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेचे कुठलेच रेकॉर्ड जिल्ह्यातील एकाही अधिकाऱ्याकडे अथवा कार्यालयाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर सुरू असलेली ही निव्वळ लूट असून ती तत्काळ थांबवावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा भुतेकर यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठविल्याचे त्यांनी सांगितले.