शहरात धूर फवारणी सुरू; ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:44 IST2021-08-26T04:44:02+5:302021-08-26T04:44:02+5:30
ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत असते. मात्र पावसाळ्यात ...

शहरात धूर फवारणी सुरू; ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाची प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत असते. मात्र पावसाळ्यात जागोजागी सांडपाणी व गावालगत पाण्याचे डबके साचलेले आढळून येते. बहुतांश गावांत नालेसफाईची कामे होत नसल्याने डासांच्या प्रमाणात वाढ होऊन आजाराला आयतेच निमंत्रण मिळत आहे. कोरोनामुळे अगोदरच शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक हैराण आहेत. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक व्यवस्था पुरती कोलमडलेली असताना आरोग्याचा खेळ मात्र आर्थिक संकटात टाकत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून अजूनपर्यंत डासांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ व त्यामुळे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. गावागावांत पूर्वी होत असलेल्या फवारणीमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन आरोग्यावर अंकुश मिळत असे; मात्र अलीकडे हा प्रकार कायमचा बंद झाल्याचे दिसून येत असल्याने आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होताना दिसत आहे . प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस उपाययोजनेची गरज असताना मात्र तसे होताना दिसत नसल्याने ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.
.....
ग्रामपंचायतींनी लक्ष देण्याची मागणी
ग्रामीण भागात वाढत असलेले आजार लक्षात घेता गावागावांत धूरफवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी लक्ष देण्याची तसेच याकडे वरिष्ठांनीही लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे.