करूणोश्वरासह वास्तव्यास आलेले ‘श्रीगणेश’
By Admin | Updated: September 7, 2014 22:50 IST2014-09-07T22:50:18+5:302014-09-07T22:50:18+5:30
वाशिम येथील प्राचीन गणेशमुर्ती; वत्सऋषीद्वारे गणेशाची स्थापना.

करूणोश्वरासह वास्तव्यास आलेले ‘श्रीगणेश’
वाशिम : वत्सगुल्म नगरीची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणार्या करूणेश्वर मंदिरामध्ये प्राचीनकालीन स्थापन झालेले जागृत गणेशाचे मंदिर प्रसिद्ध आहे. संकटात असलेल्या भक्तांच्या हाकेला धावून येण्याचे या गणरायाचे खास वैशिष्ट्य आहे म्हणूनच वाशिमकर करुणेश्वर मंदिरात असलेल्या गणपतीला संकटमोचन म्हणूनही ओळखतात.
प्राचीन काळात वत्सऋषींनी वत्सगुल्म नगरीत अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे शिवाला करूणा उत्पन्न होऊन अनेक देवतांसह वत्सऋषींच्या आश्रमात ते आले होते. वत्सऋषीच्या प्रार्थनेवरून सर्वदेवांसह तत्कालीन भक्तांचा उद्धार करण्यासाठी शंकराने श्री करूणेश्वर नावाने येथे कायमचेच वास्तव्य केले,अशी आख्यायिका आहे. याच करूणेश्वर मंदिरामध्ये वत्सऋषींनी गणेश मंदिराची स्थापना केली असावी असे पूर्वजाकडून सांगितले जाते.
करूणेश्वर मंदिरामध्ये असलेल्या या गणेशाची मनोभावे आराधना केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्णत्वास जातात , अशी आख्यायिका आहे. गणेश उत्सवामध्ये येथे भक्तांची चांगली गर्दी असते. हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, या मंदिराचा वत्सगुल्म महात्म्यामध्ये उल्लेख असल्याने या मंदिराला अनन्यसाधारण महत्व आहे.