स्पीडगनमुळे रोखला ९ हजारांवर वाहनांचा वेग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:23+5:302021-02-05T09:25:23+5:30
महामार्गांवरून धावणाऱ्या अधिकांश वाहनांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते; मात्र त्यांचा वेग अधिक राहत असल्याने जीवाच्या भीतीने रस्त्यांवर ...

स्पीडगनमुळे रोखला ९ हजारांवर वाहनांचा वेग!
महामार्गांवरून धावणाऱ्या अधिकांश वाहनांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते; मात्र त्यांचा वेग अधिक राहत असल्याने जीवाच्या भीतीने रस्त्यांवर ‘ड्यूटी’ देत असलेला कर्मचारी वाहन थांबविण्यासाठी पुढे जाऊन कारवाई करायला धजावत नाही. ही बाब लक्षात घेऊन रस्त्यावरील ३०० मीटरपर्यंतचे वाहन स्पीडगनमध्ये ‘कॅच’ करणारे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याची अपेक्षित फलश्रुती होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, २०२० या वर्षभरात अमानी महामार्ग पोलिस केंद्राच्या ताफ्यातील स्पीडगन वाहनाने वाहतूक नियम तोडणाऱ्या एकंदरीत ९ हजार ६४६ वाहनधारकांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून ९६ लाख ४९ हजारांचा दंड वसूल केला आहे. यामुळे कायदा न पाळणाऱ्या वाहनधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
.................................
वर्षभरात केलेली कारवाई
जानेवारी - ५१८
फेब्रुवारी - ४९०
मार्च - ३६७
एप्रिल - निरंक
मे - ४३
जून -१९०
जुलै - १३५
ऑगस्ट - २३२
सप्टेंबर - १५२५
ऑक्टोबर -१७४३
नोव्हेंबर -२१८९
डिसेंबर -२२१४
.................................
धावत्या वाहनांची मोजली जाते स्पीड
स्पीडगन कॅमेऱ्यासमोरून येणारे व जाणारे वाहन ३०० मीटर अंतरापर्यंत ‘कॅच’ केले जाते. कॅमेऱ्यातील लाल पॉईंट वाहनाच्या नंबरप्लेटरवर ठेवून ठराविक बटण दाबल्यानंतर वाहनाची गती स्क्रीनवर दिसून येते. वाहनाचा ठराविक वेग मर्यादेपेक्षा अधिक असल्यास संबंधित वाहनचालकाच्या मोबाईलवर तसा एसएमएस पाठवून ऑनलाईन पद्धतीने चालान भरण्याची लिंक पाठविली जाते.
.......................
अमानी महामार्ग पोलिस केंद्राला शासनाने ‘ओव्हर स्पीड’च्या कारवाया करण्यासाठी ‘इन्टरसेप्टर’ असलेले चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार चारचाकी वाहनासाठी ७४, दुचाकी ६३, ट्रक ६३ आणि एस.टी. बस ६३ अशी वेगमर्यादा ठरवून दिलेली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
- नितीन दांदडे
पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, अमानी