सोयाबीन क्षेत्रात गंधक, सुक्ष्मअन्नद्रव्य वाढीवर भर
By Admin | Updated: October 10, 2014 00:27 IST2014-10-09T23:20:23+5:302014-10-10T00:27:26+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विदर्भात शेती शाळा.

सोयाबीन क्षेत्रात गंधक, सुक्ष्मअन्नद्रव्य वाढीवर भर
अकोला : विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून, या क्षेत्रातील गंधक, सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत आहे. ही एक धोक्यांची घंटा असल्याने, या घटकांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विदर्भात शेती शाळा कार्यक्रम राबवून, शेतकर्यांना माहिती देण्यात येत आहे. शेतीतील गंधक व दुय्यम सुक्ष्म अन्नद्रव्ये घटत असल्याने कृषी विद्यापीठाने याचा गांर्भियाने विचार सुरू केला असून, विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायन विभागातंर्गत अखिल भारतीय समन्वयीत सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्पाच्यावतीने विदर्भात शेती शाळांचे आयोजन करू न शेतकर्यांना या धोक्यापासून अवगत करण्यात येत आहे. गंधक व सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पीके, प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या घटकांची जमिनीतील घसरण थांबवणे आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रीय खतासोबतच, संतुलीत खताचा वापर यापुढे करावा लागणार आहे. कृषी विद्यापीठाने आदिवासी भागासह, विदर्भातील प्रत्येक जिल्हयात शेती शाळा कार्यक्रम सुरू केले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यासाठी जनजागृती सुरू आहे. असे असले तरी शेतीतील गंधक, दुय्यम अन्नद्रव्याचे संतुलन राखणे कठीणच होत चालले आहे. यासाठीचे मार्गदर्शन या शेती शाळांमधून करण्यात येत असले तरी, भरघोस पण कमी खर्चात उत्पादन काढण्याच्या मागे लागलेल्या शेतकर्यांना समजावून सांगण्यात विद्यापीठ किती यशस्वी होते, हे येणारा काळच सांगणार आहे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, सामाजिक संघटनांना सामुहिक चळवळ राबवावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कृषी विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञ डॉ. नितीन कोंडे यांनी शेतातील गंधक व सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पीक उत्पादनात घट होत असून शेतीतील या घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेती शाळा व इतर माध्यमातून शेतकर्यांची जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.