सोयाबीन अनुदान प्रस्ताव पडताळणी अद्याप प्रलंबित!

By Admin | Updated: May 14, 2017 02:20 IST2017-05-14T02:20:08+5:302017-05-14T02:20:08+5:30

खरेदी प्रक्रियेस पाच महिने उलटूनही अनुदानाची प्रतीक्षा कायम.

Soybean grant proposal verification still pending! | सोयाबीन अनुदान प्रस्ताव पडताळणी अद्याप प्रलंबित!

सोयाबीन अनुदान प्रस्ताव पडताळणी अद्याप प्रलंबित!

वाशिम : शासनाने गतवर्षीच्या खरीप हंगामात बाजार समितीत १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २0१६ दरम्यान सोयाबीन विकणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये आणि कमाल २५ क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत शेतकर्‍यांकडून मागवून जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालकांकडे २८ फेब्रुवारीपर्यंत पोहोचणे आवश्यक होते; मात्र खरेदी प्रक्रियेस पाच आणि प्रस्ताव पाठविण्याच्या मुदतीस तीन महिने उलटूनही सदर प्रस्ताव पणन संचालकांपर्यंत अद्याप पोहोचले नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना अनुदानासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्रीपट्टीसह आपला सात-बारा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांकासह सोयाबीन विक्री केलेल्या संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर केले आहेत. या योजनेत शेतकर्‍यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार केल्यानंतर तालुका सहायक निबंधकांनी प्रस्ताव तपासून जिल्हा उपनिबंधकांना द्यावयाचे आहेत. त्यानुसार बाजार समित्यांनी मागील महिन्यात त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावांची तपासणी करून ते अर्ज तालुका निबंधकांकडे सादर केले आहेत; परंतु अद्याप हे प्रस्ताव जिल्हा स्तरावर पोहोचले नाहीत. वाशिम जिल्ह्यातून ५३ हजार ९६१ शेतकर्‍यांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले आहेत. तालुका सहायक निबंधकांकडे या अर्जांची पडताळणी सुरू आहे. तीन महिने उलटत आले तरी तालुका सहनिबंधकांकडून अर्जांची पडताळणी पूर्ण करून ते जिल्हा स्तरावर सादर करण्यात आले नसल्याची माहिती वाशिमच्या जिल्हा उपनिबंधकांकडून प्राप्त झाली आहे.

दरांसंदर्भात अनिश्‍चितता; शेतकर्‍यांमध्ये नाराजी
जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते; मात्र गतवर्षी सोयाबीन बाजार समितीमध्ये पडताच भाव गडगडले. शासनाकडून २५ क्विंटलपर्यंतच्या सोयाबीन विक्रीपोटी २00 रुपये प्रतिक्विंटल अनुदान मिळणार होते. तेही अद्याप प्राप्त झाले नाही. एकूणच या सर्व उपरोधात्मक बाबींमुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या प्रत्यक्ष पेर्‍यावर त्याचा परिणाम होईल, असे जाणकारांचे मत आहे.

शेतकर्‍यांच्या सोयाबीन अनुदानाच्या प्रस्तावाची तालुका स्तरावरील पडताळणी पूर्ण झाली असून, येत्या आठवडाभरात प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव पणन संचालकांकडे सादर करण्यात येतील.
- ज्ञानेश्‍वर खाडे
जिल्हा उपनिबंधक, वाशिम

Web Title: Soybean grant proposal verification still pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.