१.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन सुकले!
By Admin | Updated: September 14, 2016 02:19 IST2016-09-14T02:19:14+5:302016-09-14T02:19:14+5:30
वीज भारनियमनाचा फटका; सिंचनाभावी पीक वाचविण्याचे प्रयत्न निष्फळ.

१.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन सुकले!
वाशिम, दि. १३ : खरीप हंगामातील पिकांना पाणी देता यावे, यासाठी कृषी पंपांना सलग १२ तास वीज पुरवठा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली; मात्र वाशिम जिल्ह्यात आजही सलग १२ तास, तेही दिवसाच्या सुमारास विजेचे भारनियमन सुरूच आहे. परिणामी, शेतशिवारातील जलस्त्रोत, तलाव, विहिरी पाण्याने तुडूंब भरलेल्या असतानाही, खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकर्यांनी चालविलेली धडपड पूर्णत: निष्फळ ठरली असून, सुमारे १.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन सुकले आहे. वाशिम जिल्ह्यात अधिकांश शेती कोरडवाहू स्वरूपातील असल्याने खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य पावसाच्या पाण्यावरच विसंबून असते. दरम्यान, २0१३-२0१५ या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कपाशी आदी पिकांपासून किमान यंदातरी अपेक्षित उत्पन्न हाती पडून आर्थिक स्थिती सुधारेल, अशी आशा शेतकर्यांना लागली होती; मात्र गेल्या १५ ते २0 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील सर्वच पिके धोक्यात सापडली आहेत. दुसरीकडे महावितरणनेही शेतकर्यांच्या अडचणींमध्ये नेहमीप्रमाणे यंदाही भर टाकण्याचाच प्रकार अवलंबिला असून, सध्या दिवसा १२ ते १३ तास विजेचे भारनियमन केले जात आहे. रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत होतो; मात्र पिकांना पाणी देत असताना मध्येच तांत्रिक बिघाड उद्भवणे, रोहित्र जळून नादुरूस्त होणे, अधिक किंवा कमी विद्युत दाबामुळे मोटरपंप जळणे, आदींमध्ये वाढ झाल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. महावितरणने शेतकर्यांच्या अडचणी लक्षात घेऊन किमान पीक हाती येईस्तोवर तरी सुरळीत तथा अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्यांमधून जोर धरत आहे. परिस्थिती ह्यजैसे थेह्ण राहिल्यास संपूर्ण पीक हातचे जाणार.. जिल्ह्यात यंदा २ लाख ८८ हजार ६३२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, पावसाने मारलेली दीर्घ दडी आणि महावितरणने अवलंबिलेल्या अघोरी वीज भारनियमनामुळे यातील सुमारे १.५ लाख हेक्टरवरील उभे सोयाबीन पाण्याअभावी सुकले आहे. सोयाबीनची सोंगणी करण्यासाठी लागणारी मजुरीदेखील निघणार नाही, एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकर्यांनी सोयाबीनची सोंगणी न करताच थेट वखरणी करून पीक मोडून टाकायचे, असा निर्धार केला आहे. सध्याच्या परिस्थितीत आगामी आठ दिवसांत बदल न झाल्यास तथा शेतीला लागणारी वीज न मिळाल्यास संपूर्ण पीक हातचे जाईल, अशी भीती वर्तविण्यात येत आहे.