मंगरूळपीर तालुक्यात पेरणी सुरू
By Admin | Updated: July 18, 2014 01:02 IST2014-07-18T01:00:47+5:302014-07-18T01:02:33+5:30
तालुक्यात आतापर्यंत ९0.८ मिमी. पावसाची नोंद

मंगरूळपीर तालुक्यात पेरणी सुरू
मंगरूळपीर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यातील पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर असून, आतापर्यंत केवळ ९0.८ मिमी. पावसाची नोंद झाली असून, तालुक्यातील सात मंडळात आतापर्यंत केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकर्यांनी पुन्हा जोमात पेरण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्यात पेरणीलायक प्रमाणात पाऊस न झाल्याने झालेल्या पेरण्या उलटल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग दुबार पेरणीच्या चिंतेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मंगरूळपीर तालुक्यात गतवर्षी १६ जुलैपर्यंत ६२८ मि.मी. पाऊस पडला होता; परंतु यावर्षी निसर्गाने तालुक्याकडे पाठ फिरवल्या चित्र आहे जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पडलेल्या पावसावर शेतकर्यांनी काही प्रमाणात पेरण्या उरकवल्या; परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मोठय़ा प्रमाणात पेरण्या उलटल्या त्यामुळे दुबार पेरणीकरिता शेतकर्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तालुक्यातील सात मंडळाकडून पेरणी झालेल्या आकडेवारीनुसार १४ जुलैपर्यंत मंगरूळपीर मंडळात १ हजार २४५ हेक्टर म्हणजे १३ टक्के, आसेगाव मंडळात २ हजार ६८0 हेक्टर ३१ टक्के, कवठळ ३ हजार २८६ हेक्टर ३0 टक्के, शेलूबाजार १ हजार ६५६ हेक्टर २३ टक्के, धानोरा १ हजार २२५ हेक्टर १४ टक्के, पोटी ८४८ हेक्टर ११ टक्के,व पार्डी ताड मंडळात १ हजार २५0 हेक्टर १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
येत्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यापासून शेतकर्यांनी पुन्हा पेरण्याला सुरुवात केली आहे; परंतु अद्यापही योग्य पाऊस झालेला नाही. नदी-नाले तहानलेले आहेत. आकाशाकडे पाहून काही प्रमाणात पेरण्या सुरू झाल्या आहेत.