पुस नदीपात्रातून वाळूची तस्करी

By Admin | Updated: May 11, 2015 01:59 IST2015-05-11T01:59:17+5:302015-05-11T01:59:17+5:30

निर्बंधातही तस्करांची चांदी; महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांची डोळेझाक.

Smuggled from Pus River Plate | पुस नदीपात्रातून वाळूची तस्करी

पुस नदीपात्रातून वाळूची तस्करी

कोंडाळा महाली (जि.वाशिम) : तालुका व जिल्हा प्रशासनाच्या कामचलावू वृत्तीमुळे वाळूची अवैधरित्या तस्करी करणार्‍यांना रान मोकळे झाले आहे. वाशिम तालुक्यातील आसोला जहांगीर येथील पुस नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा न करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे स्पष्ट निर्देश असतानाही पात्रातून सर्रासपणे वाळूचा उपसा सुरू असल्याचे ९ मे रोजी आढळून आले. आजमितीस एक ट्रॅक्टर वाळूसाठी नागरिकांना ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. शहरासह जिल्ह्यात १४२ रेतीघाटांची नोंद आहे. त्यावरून अधिकृतरित्या तहसील प्रशासनाने आकारलेला महसूल अदा केल्याशिवाय कुठल्याच रेतीघाटावरून रेती उचलता येत नाही, असा शासकीय नियम आहे. मात्र, या नियमाला सर्रास बगल दिली जात आहे. मंडळ अधिकारी, तलाठय़ांशी संगणमत करून छुप्यामार्गाने वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे वाळूमाफीया हल्ली चांगलेच सक्रीय झाले आहेत. वाशिम शहरातील अनेक ठिकाणी वाळूची अनधिकृतरित्या साठवणूक करण्यात आलेली आहे. याकडे मात्र तहसील विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. परिणामी, वाळूमाफीयांचे चांगलेच फावत आहे. यातही गंभीर बाब म्हणजे वाळूचा उपसा केल्यास पर्यावरणाला बाधा पोचू शकतो, अशा काही नद्यांवरून वाळूच्या उपश्यावर भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सक्तीने बंदी लादली आहे. त्यात आसोला जहांगीर येथील पुस नदीचे पात्र देखील समाविष्ट आहे. मात्र, प्रशासनाच्या डोळ्यात दिवसाढवळ्या धुळफेक करून वाळूमाफीया पुस नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात वाळूचा उपसा करित आहेत. ९ मे रोजी पुस नदीच्या पात्रातून निळ्या आणि लाल रंगाचे दोन ट्रॅक्टर कुणाचीही तमा न बाळगता वाळूचा उपसा करताना आढळून आले. यामुळे प्रशासनाचा महसूल बुडण्यासोबतच नदीपात्रालाही मोठी बाधा पोचत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

Web Title: Smuggled from Pus River Plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.