आठ महिन्यात तब्बल १६ हजार शौचालय
By Admin | Updated: November 29, 2014 00:35 IST2014-11-29T00:28:53+5:302014-11-29T00:35:02+5:30
शौचालय बांधकाम मोहिमेत वाशिम तालुका माघारला

आठ महिन्यात तब्बल १६ हजार शौचालय
संतोष वानखडे / वाशिम
हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला या वर्षीच्या आठ महिन्यातच नऊ हजार शौचालय बांधकाम पूर्ण, तर सात हजार शौचालय बांधकामाचा श्रीगणेशा करण्यात यश मिळाले आहे. गत वर्षभरात केवळ १0 हजार १४६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले होते, हे विशेष.
स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट टाकण्यात आली आहे. २0१३-१४ या वर्षात वाशिम जिल्ह्यात शौचालय बांधकाम मोहिमेला जणू मरगळच आली होती. मार्च २0१४ पासून शौचालय बांधकाम मोहिमेने पकडलेली गती नोव्हेंबरपर्यंतही कायमच आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षा त घेता २0१४-१५ या वर्षात शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट १५ हजार ३७६ ठेवण्यात आले आहे. ऑक्टोबर अखेरीस जिल्ह्यात आठ हजार ९९५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, याची टक्केवारी ५८.५0 येते. नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात सहा हजार ९७७ शौचालय बांधकामांचा श्रीगणेशा केला आहे. असे एकूण १५ हजार ९७२ शौचालयांचे उद्दिष्ट आठ महिन्यातच पूर्णत्वाकडे जात आहे. शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यातच अनुदानाची रक्कम देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे निर्देश असल्याने आठ हजार ९९५ पैकी जवळपास साडेपाच हजार लाभार्थींना शौचालयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. नवीन शौचालय बांधकामाला मात्र रेतीच्या टंचाईचा फटका बसत आहे.