सहा लघुसिंचन प्रकल्पांना तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा!
By Admin | Updated: February 20, 2016 02:20 IST2016-02-20T02:20:50+5:302016-02-20T02:20:50+5:30
वाशिम तालुक्यातील शेलू एक व शेलू दोन, उमराळा कोल्ही तांडा आणि सोनगव्हाण लघुसिंचन प्रकल्पांचा समावेश.

सहा लघुसिंचन प्रकल्पांना तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा!
वाशिम : शेतकर्यांचे हिरवे स्वप्न साकारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने सहा प्रकल्पांच्या प्रस्तावांचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून तांत्रिक मान्यतेसाठी पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द केले आहेत. पाटबंधारे विभागाची तांत्रिक मान्यता कधी मिळते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
गत काही वर्षांपासून पावसात अनियमितता असल्याने शेतकर्यांना अपेक्षित उत्पादन घेण्यात अडचणी येत आहेत. कोरडवाहू शेतकर्यांचा तर काही वेळेस लागवड खर्चही वसूल होत नाही. पाण्याची सुविधा नसल्याने रब्बी हंगामात पीक घेता येत नाही. शेतीत अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी अनेक शेतकरी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत आहेत. पाटबंधारे व जलसंपदा विभागदेखील सिंचन प्रकल्पाची सुविधा निर्माण करीत आहे. तसेच जिल्हा परिषदेचा लघू सिंचन विभागही लघुसिंचन प्रकल्पांद्वारे शेतकर्यांना पाणी उपलब्ध करून देत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने ९ डिसेंबर २0१५ रोजी मालेगाव तालुक्यातील उमरदरी, रिसोड तालुक्यातील येवता, वाशिम तालुक्यातील शेलू एक व शेलू दोन, उमराळा कोल्ही तांडा आणि सोनगव्हाण अशा सहा लघुसिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. त्यानंतर लघुसिंचन विभागाने प्रशासकीय सोपस्कार पार पाडून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांच्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. धनशेट्टी यांच्या मान्यतेनंतर सहा लघुसिंचन प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला वेग येणार आहे. सध्या तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा आहे.