अभ्यासाला बसतोय; पण, मनच लागत नाही! किशोरवयीन मुलांच्या मानसिक समस्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:05+5:302021-03-13T05:15:05+5:30
वाशिम : कोरोनामुळे गत वर्षापासून शाळा बंद असल्याने किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रत्यक्ष अभ्यासातही खंड पडला आहे. मोबाइल वेड, एकाकीपणा यासह ...

अभ्यासाला बसतोय; पण, मनच लागत नाही! किशोरवयीन मुलांच्या मानसिक समस्या वाढल्या
वाशिम : कोरोनामुळे गत वर्षापासून शाळा बंद असल्याने किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रत्यक्ष अभ्यासातही खंड पडला आहे. मोबाइल वेड, एकाकीपणा यासह अन्य कारणांमुळे अभ्यासात मन लागत नसल्याचे समोर येत आहे. अभ्यासाला बसतोय; पण मनच लागत नाही, अशा प्रकारच्या मानसिक समस्यांमध्ये किशोरवयीन मुले, मुली अडकत आहेत.
आरोग्य विभागातर्फे २०१४ पासून राज्यातील वाशिमसह काही जिल्ह्यांत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. किशोरवयीन मुला-मुलींच्या समस्या, तक्रारी जाणून घेत समुपदेशन करण्यासाठी वाशिमसह रिसोड, कारंजा, मंगरूळपीर येथे ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध केली आहे. अभ्यासाला बसतोय; पण मन लागत नाही, मोबाइलच्या आहारी जाणे यासह आरोग्यविषयक समस्या किशोरवयीन मुलांकडून मांडल्या जातात.
०००
मोबाइलशिवाय करमत नाही
किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यविषयक समस्येबरोबरच मोबाइलशिवाय करमत नाही, कोरोनामुळे घरात बंदिस्त असल्याने एकाकीपण वाटणे, अभ्यासात मन न रमणे अशा प्रकारच्या समस्या, प्रश्न किशोरवयीन मुला-मुलींकडून मांडले जातात. याशिवाय शारीरिक बदल, शंका याविषयीचे प्रश्नही विचारले जातात. समुपदेशकांकडून शंकांचे निरसन केले जाते.
००
३ ठिकाणी समुपदेशकच उपलब्ध नाही
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, रिसोड, कारंजा व मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय येथे ‘मैत्री क्लिनिक’ या नावाखाली किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन केले जाते. वाशिमचा अपवाद वगळता उर्वरित तीनही ठिकाणी समुपदेशक नाहीत. येथे एड्स समुपदेशक हे समुपदेशन करतात.
००
लाॅकडाऊननंतर
मार्च ते जून या लाॅकडाऊनच्या काळात कार्यक्रम ठप्प होते. त्यानंतर किशोरवयीन मुला, मुलींच्या प्रश्नांबाबत रुग्णालय स्तरावर कार्यक्रम घेण्यात आले.