शस्त्रक्रियेसाठी एकच डॉक्टर; रुग्णांना तारीख पे तारीख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 19:41 IST2017-09-04T19:41:21+5:302017-09-04T19:41:52+5:30
वाशिम - पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शस्त्रक्रियेसाठी एकच डॉक्टर; रुग्णांना तारीख पे तारीख !
संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - पोटाच्या विकारासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रुग्णांना ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिब कुटूंबातील रुग्णांना मोफत स्वरूपात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. १०० खाटांवरून या दवाखान्यात २०० खाटांची सुविधा उपलब्ध झाली. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची वाणवा असल्याने रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात व्यत्यय निर्माण होत असल्याचे दिसून येते. जिल्हा सामान्य रुग्णालयात एम.एस. (सर्जन) म्हणून डॉ. बडे हे एकमेव डॉक्टर सेवा देत आहेत. याच डॉक्टरांकडे मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही दिवस जिल्हा सामान्य रुग्णालयात तर काही दिवस मालेगाव ग्रामीण रुग्णालयात सेवा द्यावी लागते. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रूग्णांना एक ते दीड महिन्यानंतरची तारीख दिली जात आहे. दिलेल्या तारखेला शस्त्रक्रिया होईलच याची कोणतीही खात्री नाही. जुलै महिन्यात तपासणी केलेल्या एका रूग्णाला २१ आॅगस्टला बोलाविण्यात आले होते. नेमके या दरम्यान डॉ. बडे यांची ड्यूटी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात लावण्यात आली. त्यानंतर आठ दिवसांनी या असे रुग्णाला सांगण्यात आले. सदर रुग्ण व नातेवाईक २८ आॅगस्ट रोजी आले असता, ११ सप्टेंबरची तारीख देण्यात आली. यासंदर्भात तत्कालिन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. पटेल यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जनार्दन जांभरूणकर यांना भेटण्यास सांगितले. डॉ. जांभरूणकर यांनी ३१ आॅगस्टला या, असे रुग्ण व नातेवाईकांना सांगितल्यानंतर ३१ आॅगस्टला रुग्ण व नातेवाईक आले. तथापि, या दिवशीदेखील शस्त्रक्रिया झाली नाही. डॉक्टरांची रिक्त पदे असल्याने हा प्रश्न निर्माण होत असल्याचे डॉ. जांभरूणकर यांनी सांगितले. आता या रूग्णाला ११ सप्टेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे. असाच अनुभव शस्त्रक्रियेसाठी येणाºया अन्य रुग्णांना येत आहे.