वारला प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी
By Admin | Updated: August 5, 2014 23:20 IST2014-08-05T23:20:31+5:302014-08-05T23:20:31+5:30
जागेचा लोचा कायम: निवासस्थानही नाही

वारला प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी
अनसिंग : पाच वर्षापूर्वी अनसिंगला ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वारला येथे स्थलांतरति करण्यात आले. मात्र, पाच वर्षातही स्वतंत्र जागाच उपलब्ध झाली नसल्याने सद्यस्थितीत ग्रा.पं.च्या दोन खोलीत या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरु आहे. वारला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनसिंग १, अनसिंग २, वारला, उकळीपेन, सावळी, बाभुळगाव, उमरा (शम.), पिंपळगाव असे आठ उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रामध्ये ३९ गाव अंतभरूत असून या एकूण गावातील लोकसंख्या ६७,७२४ आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दोन वैद्यकीय अधिकार्यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये डॉ. एस.डी. सुडे व डॉ. खान हे या ठिकाणी कार्यरत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारत नसल्यामुळे आवश्यक त्या उपकरणांचा फायदा रुग्णांना देता येत नाही. या ठिकाणी इमारत नसल्यामुळे कर्मचार्यांना निवासाची व्यवस्था नाही. या आरोग्य केंद्रामध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नाही. तरीसुद्धा वाशिम, तोंडगाव, पार्डी, अनसिंग, आसेगाव या ठिकाणी जाउन कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्या जाते. समस्येच्या गर्तेत अडकलेल्या या आरोग्य केंद्राकडे लक्ष द्यायला जिल्हा प्रशासनाजवळ वेळ नसल्याने रोष व्यक्त होत आहे. तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील एका जागेची पाहणी करण्यात आली होती. ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र देण्यासही तयार आहे. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील जागेची प्रत्यक्ष पाहणी करून गेले. मात्र, त्यानंतर कुठे माशी शिंकली, हे सर्वसामान्य रुग्णांना माहित नाही. या जागेचा गुंता अजूनही (दि.१३) सुटला नसल्याने सुविधा नसलेल्या दोन इमारतीत रुग्णांवर उपचार केले जातात. डॉक्टर व कर्मचार्यांना राहण्यासाठी निवासस्थानाची सुविधादेखील नाही.