चार केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा!
By Admin | Updated: September 13, 2016 02:56 IST2016-09-13T02:56:37+5:302016-09-13T02:56:37+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आढावा बैठकीला दांडी मारणे भोवले.

चार केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा!
वाशिम, दि. १२: जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आढावा बैठकीला दांडी मारणार्या मानोरा तालुक्यातील चार केंद्र प्रमुखांना मानोरा गटशिक्षणाधिकार्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी मानोरा येथे बुधवारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला केंद्र प्रमुखांसह तालुकास्तरावरील विभाग प्रमुखांनी उपस्थित राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या होत्या. या बैठकीला काही जण अनुपस्थित असल्याची बाब हर्षदा देशमुख यांच्या निदर्शनात आल्यानंतर दांडीबाज अधिकारी - कर्मचार्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांनी चार केंद्र प्रमुख अनुपस्थित राहिल्याचा अहवाल दिला. या केंद्र प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी केल्यानंतर पवार यांनी चार केंद्र प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तथापि, आगामी तीन दिवसात यासंदर्भात खुलासा सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत दांडीबाज अधिकारी-कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली.