उन्हाळ्याच्या नियोजनासाठी बसगाड्यांची कमतरता!
By Admin | Updated: April 14, 2017 01:20 IST2017-04-14T01:20:26+5:302017-04-14T01:20:26+5:30
शैक्षणिक सत्र संपण्याची प्रतीक्षा: २० एप्रिलपासून अतिरिक्त बसफेऱ्यांना सुरुवात

उन्हाळ्याच्या नियोजनासाठी बसगाड्यांची कमतरता!
वाशिम: उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसफेऱ्या वाढविण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नियोजन असले तरी, प्रत्यक्षात पुरेशा बसगाड्या उपलब्ध नसल्यामुळे बसफेऱ्या वाढविणे अशक्य झाले आहे. आता शाळा बंद झाल्यानंतर मानव विकास मिशनच्या खाली राहणाऱ्या बसगाड्यांचा वापर करून इतर बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून कळले.
उन्हाळ्याच्या सुट्यांत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. लग्नसराई, सोयरिकसंबंध, सहलीचे नियोजन अनेकांकडून उन्हाळ्यात केले जाते. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने महामंडळाला त्याचा फायदा व्हावा आणि प्रवाशांचीही सोय व्हावी, यासाठी एसटी अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करते; परंतु या नियोजनासाठी नव्या बसगाड्या मिळणे शक्य नसते किंवा आगारांकडे शिल्लक बसगाड्याही नसतात. त्यामुळे या नियोजनासाठी मोठी कसरत करावी लागते. मानव विकास मिशनसाठी वापरण्यात येणाऱ्या एसटीच्या बसगाड्या उन्हाळ्याच्या दिवसांत खाली होतात; परंतु त्यासाठी शाळांचे सत्र पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागते. यंदा २० एप्रिल रोजी शैक्षणिक सत्र संपणार असल्याने त्यानंतरच उन्हाळ्याच्या अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करता येणार असल्याने अद्याप कोणत्याही आगाराला अतिरक्त बसफेरी सुरू करण्याची परवानगीच मिळू शकली नाही. येत्या २० एप्रिलनंतर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आगाराकडून सकाळी ७.३० वाजताची मंगरुळपीर जालना, ८.४५ वाजताची मंगरुळपीर औरंगाबाद, ११.०० वाजताची मंगरुळपीर-दिग्रस, तसेच दुपारी २.३० वाजताची मंगरुळपीर आगाराची अकोला-पुसद या चार अतिरिक्त बसफेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती मंगरुळपीरचे आगार व्यवस्थापक युुधीष्टीर रामचवरे यांनी सोमवारी दिली. त्यामुळे २० एप्रिलपर्यंत एसटीच्या प्रवाशांची वाताहत होण्याची शक्यता आहे.
मानव मिशनच्या बस वापरणार!
शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मानव मिशनच्यावतीने एसटीमार्फत मोफत प्रवासाची सोय केली आहे. यासाठी वापरण्यात येत असलेल्या एसटी बस शैक्षणिक सत्रानंतर उन्हाळ्याच्या नियोजनात वापरण्यात येणार आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्यात प्रवाशांची संख्या वाढते. एसटी महामंडळाच्यावतीने त्यासाठी नियोजनही करण्यात येत असते; परंतु उपलब्ध असलेल्या बसगाड्या लक्षात घेऊनच नियोजन करावे लागते. आमच्याकडे बसगाड्या शिल्लक नाहीत. येत्या १० एप्रिल रोजी शैक्षणिक सत्र संपल्यानंतर मानव मिशनच्या सहा गाड्या आमच्याकडे उपलब्ध असतील. या गाड्या उन्हाळ्याच्या दिवसांत अतिरिक्त फेऱ्यांसाठी वापरण्यात येतील. तशाच सूचना वरिष्ठांकडून आलेल्या आहेत. २० एप्रिलपासूनच उन्हाळ्याच्या सुट्यांचे नियोजन करण्याचे आदेश त्यांच्याकडून आलेले आहेत.
- युधिष्टीर रामचवरे, आगार व्यवस्थापक मंगरुळपीर