दुकानाला आग; तीन लाखांचे नुकसान
By Admin | Updated: May 12, 2015 01:21 IST2015-05-12T01:21:13+5:302015-05-12T01:21:13+5:30
शिवाजी चौकातील घटना; मिठाईचे दुकान खाक.

दुकानाला आग; तीन लाखांचे नुकसान
वाशिम : स्थानिक बालूचौक स्थित बाबूलाल हलवाई या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिठाईच्या दुकानाला आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सदर घटनेत मिठाईचे दुकान आगित भस्म झाले असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानाचे संचालक राजू उदासी यांनी दिली. सोमवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास बालू चौक परिसरात सफाई कामगार परिसराची स्वच्छता करताना बाबूलाल हलवाई यांच्या दुकानातून धूर निघत असल्याचे दिसून आले. हे त्यांनी पाहताच न.प.अग्निशामक दलाचे दिनकर सुरोशे यांना भ्रमणध्वनीवर कळविले. सुरोशे यांनी त्वरित न.प.ची अग्निशामक गाडी व आपला ताफा घेऊन घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. आग विझविताना अग्निशामक वाहनाचे चालक दिनकर सुरोशे यांच्या पायावर काच पडल्यामुळे ते जखमी झाले तर त्यांचे सहकारी फायरमन अब्दुल रियाहत यांना सुद्धा मार लागला. अग्निशामक दलाचे दिनेश तिवारी व सोनु सुरोशे यांनीसुद्धा आग विझविण्यात सहकार्य केले. अग्निशामक दल वेळेवर घटनास्थळी पोहोचल्यामुळे परिसरातील अन्य दुकाने आगीपासून वाचलीत. या आगीमुळे दुकानातील संपूर्ण फर्निचर, फ्रीज, पंखे, शोकेस आदी सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.