सोनेरी दिवसात खरेदीचे होणार ‘सीमोल्लंघन’
By Admin | Updated: October 3, 2014 00:41 IST2014-10-03T00:41:02+5:302014-10-03T00:41:02+5:30
कोरड्या दुष्काळाच्या सावटातही वाशिम येथील बाजारपेठ फुलली, खरेदीसाठी लगबग.

सोनेरी दिवसात खरेदीचे होणार ‘सीमोल्लंघन’
वाशिम : साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा मानल्या जाणार्या दसर्याच्या मुहूर्तावर वाशिमसह जिल्हावाशी वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दसर्याचा मुहुर्त साधत सोने खरेदी करण्याला ग्राहक पसंती देत आहेत. मात्र, कोरड्या दुष्काळाच्या सावटामुळे सराफा बाजाराला दसर्याच्या मुहूर्ताच्या दिवशी मध्यम स्वरूपाचा प्रतिसाद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
यंदाच्या दसर्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दसर्याच्या पूर्वसंध्येला शोरूममध्ये समाधानकारक बुकिंग झाली नव्हती. मुहूर्तावर गाडी घरी नेण्याचे नियोजन अगोदरच करून ठेवण्यात आल्याने काही खरेदीदारांनी गाडी अगोदरच बुक करून ठेवली आहे. यामुळे विक्रेत्यांना दसर्याच्या मुहूर्तावर गाडी देणे सोपे होणार आहे. दिवस मावळला तरीही चालेल पण मुहूर्तावर गाडी घरी न्यायचीच असा अनेकांचा अट्टाहास असल्यामुळे विक्रेतेही या दिवशी विशेष काळजी घेत असतात. उद्याही सर्वच शोरूम मध्ये काही काऊंटर वाढविण्यात येतील, अशी शक्यता आहे. यावर्षी दुचाकी वाहनांची खरेदी गतवर्षीसारखीच राहिल असा अंदाज वर्तविण्याबरोबरच खरिपाचा हंगाम निराशाजनक जात असल्याने ट्रॅक्टरच्या खरेदीत निरुत्साह असल्याचे शोरूम संचालकांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना स्पष्ट केले. दसर्याच्या पूर्वसंध्येपर्यंत चारचाकी वाहनांची बाजारपेठ फारशी तेजीत नव्हती. दसर्याच्या प्रत्यक्ष दिवशी कदाचित बाजारपेठ तेजीत येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. दुचाकी वाहनांची बाजारपेठ मात्र तेजीत राहिल, असा विश्वासही शहरातील विविध शोरुमच्या संचालकांनी व्यक्त केला. इलेक्ट्रानिक्स वस्तु, मोबाईल व सोने खरेदीची अशीच परिस्थिती राहणार आहे. काही लोकांनी आजच सोन्याची खरेदी केल्यामुळे कदाचित सराफा बाजारात राहणारी गर्दी कमी राहणार असली तरी इलेक्टॉनिक्स वस्तुच्या खरेदीसाठी गर्दी मात्र राहणार आहे. डिस्काऊंटच्या ऑफर असल्याने साहजिकच इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची बाजारपेठ तेजीत राहील.