शिरपूरचे वैद्यकीय अधिकारी निलंबित
By Admin | Updated: March 1, 2016 01:13 IST2016-03-01T01:13:53+5:302016-03-01T01:13:53+5:30
ढोरखेडाप्रकरणी आरोग्य संचालनालयाचे आदेश.

शिरपूरचे वैद्यकीय अधिकारी निलंबित
शिरपूर जैन : शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांना ढोरखेडाप्रकरणी निलंबित केले असून, आरोग्य संचालनालयाचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकार्यांना प्राप्त झाले आहेत.
सप्टेंबर २0१५ मध्ये मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथे चक्रिवादळात अध्र्याअधिक घरांवरील टिन उडून गेले होते तर काही घरे जमीनदोस्त झाली होती. अनेकांना दुखापत झाल्याने शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते. वैद्यकीय सेवा तातडीने घटनास्थळी पोचविण्यात शिरपूर आरोग्य केंद्राने दिरंगाई केल्याचे समोर आले होते. याबाबत ढोरखेडा येथील नागरिकांनी जिल्हा परिषद व आरोग्य विभागाकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. ढोरखेडा गावात तातडीने आरोग्य सेवा पोचविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसा अहवालही आरोग्य विभाग व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी आरोग्य संचालनालयाकडे पाठविला होता. चौकशीअंती दोषी आढळल्याने डॉ. महाजन यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकार्यांना प्राप्त झाले. या वृत्ताला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दुजोरा दिला. दरम्यान, आरोग्य संचालनालयाच्या आदेशाने कामचुकार अधिकारी-कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. कर्तव्यात दिरंगाई करणार्यांची गय केली जाणार नाही, वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिला.