शिरपूरचा पाणी पुरवठा पाच दिवसांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:31+5:302021-02-13T04:39:31+5:30
शिरपूर जैन येथे अडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अडोळ प्रकल्पाचे शिरपूर ग्रामपंचायतीकडे चार ते पाच ...

शिरपूरचा पाणी पुरवठा पाच दिवसांपासून ठप्प
शिरपूर जैन येथे अडोळ प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अडोळ प्रकल्पाचे शिरपूर ग्रामपंचायतीकडे चार ते पाच लाख रुपये पाणी बिल थकीत झाले. पाटबंधारे विभागाने शिरपूर ग्रामपंचायतला पाणी बिल भरण्यासाठी वेळोवेळी सूचनाही दिल्या. तथापि, ग्रामपंचायतीने पाणी बिल भरण्यास टाळाटाळ केली. त्यातच ऑगस्ट महिन्यापासून शिरपूर ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्त असल्याने व कोरोना काळात ग्रामपंचायत कामकाज चालविण्यासाठी आवश्यक कर वसुली यंत्रणा करू शकली नाही. त्यामुळेही थकित पाणीबिल भरणे ग्रामपंचायतीला शक्य झाले नाही. परिणामी पाटबंधारे विभागाने महावितरण कार्यालयाला पत्र देऊन शिरपूर पाणी पुरवठा योजनेचा अडोळ प्रकल्पावरील वीज पुरवठा खंडित करण्यास भाग पाडले. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून शिरपूर येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
------------
प्रशासनाने दखल घेण्याची गरज
शिरपूर येथील पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे; परंतु ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर नवी ग्रामपंचायत अद्याप गठित झाली नाही. त्यामुळे नवीन सरपंच पदारूढ होईपर्यंत ही समस्या दूर होणे शक्य नसल्याचे दिसते. दुसरीकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून चार दिवसांपासून पाणीपट्टी व घरकर वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पाटबंधारे विभागाचे देयकही भरले, तरी महावितरणचे ४० लाख रुपयांचे थकित देयक भरण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर उभा आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.