शेलू ग्रा.पं. निवडणुकीत गतवेळचा एकही सदस्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST2021-01-09T04:33:52+5:302021-01-09T04:33:52+5:30
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार ग्रामपंचायतचा समावेश असून, या ...

शेलू ग्रा.पं. निवडणुकीत गतवेळचा एकही सदस्य नाही
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार ग्रामपंचायतचा समावेश असून, या ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसाअखेर ४० उमेदवार रिंगणात उरले आहेत. शेलूबाजार ही ग्रामपंचायत मंगरुळपीर तालुक्यात एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. तालुक्यातील राजकारणाचा हा केंद्रबिंदूही मानला जातो. या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातून पंचायत समिती, जिल्हा परिषदेत जाणारे बडे नेते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सक्रिय आहेत. विविध पक्षांचे पुढारी आणि लोकप्रतिनिधींचा यात समावेश आहे. शेलूबाजारपासून काही अंतरावरूनच आता समृद्धी मार्ग जात आहे, तर आधीच या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातून नागपूर-औरंगाबाद हा द्रुतगती मार्ग आणि अकोला-आर्णी हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने यंदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशात गतवेळी ग्रामपंचायतीत निवडून येणाºया एकाही सदस्याने यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली नाही. हा विषय सर्वांना संभ्रमात टाकणारा ठरला असून, ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांत या मुद्यांवर विविध चर्चा हाेत आहेत.
---------
नव्या सदस्यांवर विकासाची जबाबदारी
शेलूबाजार ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १३ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवारांनी यापूर्वी निवडणूक लढविली असली तरी, गतपंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या एकाही उमेदवाराने यंदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्जच दाखल केलेला नाही. त्यामुळे यंदा शेलूबाजार ग्रामपंचायतीत निवडून येणारे सदस्य नवेच राहणार आहेत. या नव्या सदस्यांना ग्रामपंचायत अंतर्गत विविध समस्या सोडवून दळणवळणाच्या नव्या सुविधेच्या आधारे विकासाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.