शेलू बाजारच्या ग्रा.पं. सदस्याची याचिका उच्च न्यायालयात खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:38 IST2021-02-14T04:38:23+5:302021-02-14T04:38:23+5:30
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायत शेलू बाजार येथील हितेश वाडेकर यांनी वाॅर्ड क्रमांक ३ मधून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते; परंतु ...

शेलू बाजारच्या ग्रा.पं. सदस्याची याचिका उच्च न्यायालयात खारीज
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायत शेलू बाजार येथील हितेश वाडेकर यांनी वाॅर्ड क्रमांक ३ मधून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते; परंतु हितेश वाडेकर यांना तीन अपत्ये असल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी हरकत छाननीच्या वेळी शेलू बाजार येथील सुनील हरणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. हरणे यांचा आक्षेप मान्य करत निवडणूक अधिकाऱ्यांनी वाडेकर यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरवले होते. यानंतर वाडेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ४ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश पारित करून वाडेकर यांचा नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याचा आदेश पारित केला; परंतु हा अंतरिम आदेश रिट याचिकेच्या अंतिम निर्णयास अधीन राहील, असे नमूद केले होते. ही यांची रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ९ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. यावेळी हरणे यांचे अधिवक्ता अमित बंड यांनी वाडेकर यांनी केलेली रिट याचिका ही उच्च न्यायालयापुढे चालू शकत नाही, असा युक्तिवाद केला व त्यासाठी न्यायालयापुढे मुंबई खंडपीठ येथील करणवीर अवताडे विरुद्ध राज्य निवडणूक आयोग या प्रकरणाचा दाखला दिला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून वाडेकर यांची रिट याचिका खारीज केली. या प्रकरणात हरणे यांच्याकडून ॲड. अमित बंड यांनी काम पाहिले.