रस्त्यावरील खड्ड्यात लावले बेशरमचे रोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:48+5:302021-08-15T04:41:48+5:30
राजुरा परिसरातून गेलेल्या समृद्धी तथा अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामासाठी रिधोरा-खैरखेडा मार्गावरील राजुरानजिकच्या टेकड्यांचे खोदकाम गौणखनिजाची वाहतूक सुरू आहे. ...

रस्त्यावरील खड्ड्यात लावले बेशरमचे रोपटे
राजुरा परिसरातून गेलेल्या समृद्धी तथा अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामासाठी रिधोरा-खैरखेडा मार्गावरील राजुरानजिकच्या टेकड्यांचे खोदकाम गौणखनिजाची वाहतूक सुरू आहे. जड वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात गौण खनिज भरून ५० पेक्षा अधिक वाहने रात्रंदिवस या रस्त्यावरून ये-जा करतात. यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून छोट्या पुलांसह बेंदाडी नदीवरील पुलालाही मोठे भगदाड पडले आहे. परिणामी, या मार्गावरील जड वाहतूक सध्या बंद पडली आहे. दुचाकीचालकांनाही जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.
याबाबत मध्यंतरी संबंधित यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे राजुरा ग्रामपंचायतीने लेखी पत्रव्यवहार करून रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी केली; मात्र ती बेदखल ठरली. याउलट या रस्त्यावरून गेल्या काही दिवसात गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अधिकची वाढ झाल्याने रस्ता पूर्णत: उखडला गेला आहे. त्यामुळे अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यांत बेशरमचे रोपटे लावून निषेध नोंदला. या आंदोलनात राजुरा येथील प्रकाश बोरजे, विष्णू रवणे, आलियारखाॅ पठाण, ग्रामपंचायत सदस्य गोपाल पातळे, मोहन कांबळे, सुभाष भेंडेकर, सुभाष भरदमकर, ॲड. नरेंद्र आढाव, शिवा खराटे, मनोज मोहळे, इंदल पुरुषोत्तम, एकनाथ टोंचर, मुन्ना राऊत, वसंता कांबळे आदिंनी सहभाग नोंदविला.