सात हजार कुटुंबांना मिळणार नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 04:36 PM2021-08-11T16:36:53+5:302021-08-11T16:37:09+5:30
Washim News : ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार.
वाशिम : जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जल जीवन मिशनचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. बी. साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. पी. राऊत, उपअभियंता सर्वश्री एस. पी. बोरकर, एस. एन. राठोड, डी. जी. होळकर, आर.टी. नारकर, सहायक अभियंता व्ही. एल. गिरी, जे. पी. तायडे यांची उपस्थिती होती. या सभेत ११ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या ५१ कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जल जीवन मिशनच्या माध्यमातून करण्यात येणारी पाणीपुरवठा योजनांची कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देशही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्ह्यातील ५१ गावातील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता साळुंखे यांनी दिली.