दहावीच्या परीक्षेत सात कॉपीबहाद्दर निलंबित
By Admin | Updated: March 9, 2016 02:24 IST2016-03-09T02:24:26+5:302016-03-09T02:24:26+5:30
गणिताच्या पेपरला कारवाई; अकोला जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घातल्या धाडी.

दहावीच्या परीक्षेत सात कॉपीबहाद्दर निलंबित
अकोला: इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घातलेल्या धाडीत सात कॉपीबहाद्दारांना निलंबित करण्यात आले.
इयत्ता दहावीचा मंगळवारी गणित विषयाचा पेपर होता. पेपर सुरू असताना विस्तार शिक्षण अधिकारी स्मिता परोपटे यांच्या महिला भरारी पथकाने आकोट येथे धाड घालून एका विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडले. पथकाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच निलंबित केले. यासोबतच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या भरारी पथकाने दोन विद्यार्थ्यांंना कॉपी करताना पकडले. या दोनही विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. परीक्षा केंद्रावर कॉपी करताना विद्यार्थी आढळून आल्याने, केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांवरील कारवाईसाठी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाकडे अहवाल पाठविला आहे.