संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त
By Admin | Updated: October 14, 2014 01:49 IST2014-10-14T01:49:53+5:302014-10-14T01:49:53+5:30
वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात पोलिसांचा कडकोट बंदोबस्त.

संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त
वाशिम : १५ ऑक्टोबर रोजीचे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणेने केलेल्या चाचपणीतून जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतींमधील मतदान केंद्रे उपद्रवी व संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने परिपूर्ण तयारीचा अंतिम टप्पाही पूर्ण केला आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या ४00 जवांनाचा ताफा जिल्ह्यात दाखल झाला असून, स्थानिक पोलिस दलाचे १0६५ आणि गृहरक्षक दलाचे ३५0 जवानही तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात वाशिम, रिसोड व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यात ८ लाख ९६ हजार ७२५ मतदारांची संख्या आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८७ हजार ७६९, वाशिम मतदारसंघात ३ लाख २२ हजार ९३४, तर कारंजा मतदारसंघात २ लाख ८६ हजार २२ अशी मतदारसंख्या आहे. जिल्ह्यात ९६५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यापैकी रिसोड मतदारसंघात ३0९, वाशिम ३३९ व कारंजा मतदारसंघात ३१७ मतदान केंद्रे आहेत.
उमेदवार आता छुप्या प्रचाराद्वारे मतदारांना आपलेसे करण्यात गुंतले आहेत. दुसरीकडे स्थानिक कार्यकर्ते व उमेदवारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये म्हणून जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा उपद्रवी व संवेदनशील मतदान केंद्रांची चाचपणी करीत आहे. संवेदनशील मतदान केंद्राची नोंद असलेल्या गावांमधून पोलिस प्रशासनाच्या वतीने रूट मार्चही काढण्यात आला आहे.
रिसोड विधानसभा मतदारसंघात नऊ मतदान केंद्रांची नोंद संवेदनशील म्हणून झाली आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील १२ आणि कारंजा मतदारसंघात सर्वाधिक १६ मतदान केंद्रे पोलिस प्रशासनाच्या दप्तरी संवेदनशील आहेत.