दुसऱ्या लाटेत दानशुरांचा ओघ ओसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST2021-05-31T04:29:27+5:302021-05-31T04:29:27+5:30
मागील वर्षी २२ मार्च रोजी देशभरात एक दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण ...

दुसऱ्या लाटेत दानशुरांचा ओघ ओसरला
मागील वर्षी २२ मार्च रोजी देशभरात एक दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे देशभरातील लाखो कामगार, मजुरांचा रोजगार हिरावला गेला होता. अशीच परिस्थिती वाशिम जिल्ह्यातील विविध भागात निर्माण झाली होती. परिणामत: लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी उद्योजक, राजकीय नेते, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन गरजू , गोरगरिबांना घरोघरी, वाडया, वस्त्यांमध्ये जाऊन अन्यधान्य, किराणा किट असे साहित्य वाटप करून मदतीचा हात दिला होता. तसेच कोरोनाचा फ्रन्टलाईन वर्कर म्हणून सामना करणाऱ्या पोलीस, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका यांना मास्क, सॅनिटायझर, साबणयुक्त आरोग्य किट वाटप करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात रोजगार हिरावल्याने मोठ्या शहरातून आपापल्या गावी पायदळ परत जाणाऱ्या मजुरांची उपासमार लक्षात घेऊन विविध ठिकाणी भोजन व इतर साहित्य वितरण करण्यात आले. या तुलनेत यावर्षी अशी मदत देताना कुठलेही राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते अपेक्षित प्रमाणात आढळून आले नाहीत. यावरून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दानशूरता घटली असल्याचे दिसून येत आहे. आजही बऱ्याच लोकांचा विशेषतः व्यवसाय दीड वर्षांपासून बंद आहे. समाजातील दानशूरता घटली असली तरी या व्यवसायातील लोकांना किमान शासनाकडून तरी मदत मिळणे अपेक्षित आहे.