सातबा-याचे संकेतस्थळ तीन दिवसांपासून बंद!
By Admin | Updated: March 18, 2016 02:02 IST2016-03-18T02:02:07+5:302016-03-18T02:02:07+5:30
सर्व्हर ठप्प असल्यामुळे शेतक-यांना सोसावा लागतो भुर्दंड.

सातबा-याचे संकेतस्थळ तीन दिवसांपासून बंद!
दादाराव गायकवाड / कारंजा लाड
शेतक-यांना सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची यंत्रणा जिल्हा प्रशासनाने निर्माण केली. याचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले; परंतु ऑनलाइन सातबारा यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून ठप्प पडली आहे. याचा भुदर्ंड दूरवरून येणार्या शेतकर्यांना सोसावा लागत आहे.
जिल्हाधिकार्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाइन सातबारा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एका दिवसात सातबारा मिळत असल्याने शेतकरी याचा लाभ घेत आहेत; परंतु मागील तीन दिवसांपासून ही यंत्रणा ठप्प पडली आहे. शेतकरी कॉम्प्युटर केंद्रावर वेळोवेळी येत आहेत, आणि त्यांना यंत्रणा बंद पडल्याचे कारण सांगून बाहेर पाठविले जात आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
विविध ठिकाणच्या कॉम्प्युटर केंद्रांवर झेरॉक्स मशीन, ऑनलाइन सातबारासह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. तहसील कार्यालयात आलेल्या शेतकर्याला बाहेर अशी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात शेतकर्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सुरू केलेल्या स्वतंत्र संकेतस्थळावरून नि:शुल्क सातबारा काढता येतो; परंतु शेतकर्यांच्या घरी संगणक नसल्याने त्यांना नेट कॅफे किंवा एखाद्या कॉम्प्युटर केंद्रात जावे लागते. त्या ठिकाणी शेतकर्याला अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ऑनलाइन सातबारा काढून देण्यासाठी २0, ३0, ५0, ते १00 रुपयांपर्यंत पैसे घेतले जातात. अशा प्रकारे शेतकर्यांना १५0 ते २00 रुपये खर्च करावे लागत आहे. शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ऑनलाइन सातबारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र, सर्व्हरवरील लोड वाढून ही वेबसाइट वारंवार हँग होत आहे. त्यामुळे सातबारा काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी ऑनलाइन सातबारा शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.