‘रोहयो’च्या कामांचे शास्त्रशुद्ध आराखडे होणार तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:59+5:302021-09-11T04:42:59+5:30
वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी शेतीमालाच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येक शेताला सिंचनासाठी पाणी मिळणे ...

‘रोहयो’च्या कामांचे शास्त्रशुद्ध आराखडे होणार तयार
वाशिम : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती होण्यासाठी शेतीमालाच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येक शेताला सिंचनासाठी पाणी मिळणे गरजेचे असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करावयाच्या कामांचा गावनिहाय तंत्रशुद्ध आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुषंगाने प्रायोगिक तत्त्वावर मालेगाव तालुक्यातील ७ गावांची निवड करण्यात आली आहे.
देशभरातील १११ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय असून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्यासाठी शेतातून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘मनरेगा’अंतर्गत जलसंधारणाची कामे करून, गावात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब गावातच जिरविण्याचे नियोजन करणे, गावनिहाय ‘जीएसआय’ आधारित आराखडा तयार करणे, पहिल्या टप्प्यात ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’अंतर्गत निवड केलेल्या मानोरा व मालेगाव तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण करून आराखडे तयार करण्यासोबतच जिल्ह्यात फळबाग लागवड, शेतमालासाठी गोडावून उभारणीच्या कामांवर विशेष भर दिला जात आहे.
............
आराखडा तयार करण्यासंबंधी ग्रामसभांद्वारे मार्गदर्शन
तिवळी, गांगलवाडी, कुत्तरडोह, ढोरखेडा, बोराळा जहागीर, खैरखेडा आणि कोलदरा या सात गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येत आहे. त्यात गाव परिसरात ‘रोहयो’अंतर्गत करावयाच्या कामांचा शास्त्रशुद्ध आराखडा तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
...............
कुत्तरडोहला मुख्य सचिवांची भेट
मालेगाव तालुक्यातील कुत्तरडोह या गावाला मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘रोहयो’अंतर्गत करावयाच्या कामांचा शास्त्रशुद्ध आराखडा तयार करण्याबाबत कुठलीही अडचण जाणवल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.