गतवर्षीची थकीत रक्कम वसुलीसाठी शाळांचा पालकांना तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:17+5:302021-02-13T04:39:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : काेराेना संसर्गामुळे अचानक बंद झालेल्या शाळांमुळे अनेक पालकांची आपल्या पाल्यांची शाळेची फी भरायची राहली ...

गतवर्षीची थकीत रक्कम वसुलीसाठी शाळांचा पालकांना तगादा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : काेराेना संसर्गामुळे अचानक बंद झालेल्या शाळांमुळे अनेक पालकांची आपल्या पाल्यांची शाळेची फी भरायची राहली हाेती. ही रक्कम शाळाच न झाल्याने मागितल्या जाणार नसल्याचे पालकांना वाटत असतानाच शाळा सुरू झाल्याबराेबर संस्थाचालकांनी पालकांना फी भरण्याचा तगादा लावल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. काेराेना संसर्ग पाहता शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाने आवाहन केले हाेते. त्यामुळे शाळा बंद राहिल्यात. अशावेळी शाळांनी ऑनलाइन क्लासेसवर भर देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. काेणत्याच प्रकारची परीक्षा न हाेता विद्यार्थी पुढच्या वर्गात पाठविण्यात आले; परंतु पालकांचे म्हणणे आहे की, मुले शाळेतच गेली नाहीत व परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत, तर मग पैस कसे द्यायचे; परंतु शाळा संचालक वेगवेगळया क्लृप्त्या लढवून पालकांमागे पैशांसाठी तगादा लावत असल्याचे दिसून येत आहे. संस्थाचालकांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन क्लासेस घेतल्याने शिक्षकांना पगार करावाच लागला, शिवाय विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षासुद्धा घेण्यात आली. त्यामुळे शिक्षकांचे पगार केल्याने फी भरावीच लागणार आहे. नाहीतर आपल्या पाल्यांना ओळखपत्र दिले जाणार नाही. परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे सांगण्यात येत असल्याने पालकांकडे काेणत्याच प्रकारचा इलाज नसल्याने पालक नाइलाजास्तव पैसे भरताना दिसून येत आहेत.
याकडे शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष दिसून येत आहे. अनेक पालकांचा शिक्षण संस्थाचालकांशी यावरून वादसुद्धा उद्भवत आहे. केवळ मुला- मुलींच्या भवितव्याचा विचार करता पालक गप्प असल्याचे एका पालकाने सांगितले, तसेच शिक्षण विभागाने यावर काहीतरी उपाययाेजना करावी व काेराेना काळातील फी न स्वीकारण्याची मागणी पालकांतून केली जात आहे.
ज्या पालकांकडे गतवर्षीची पूर्णच रक्कम थकीत असेल त्यांच्याकडून काेराेनापूर्वीचीच फी आकारण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
........................
पालक म्हणतात...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळात सक्तीने फी वसूल करू नये, असे शिक्षण विभागाचे निर्देश हाेते; परंतु आता शाळा पूर्ववत झाल्याने मागच्या थकबाकी वसुलीसाठी पालकांना वेठीस धरले जात असल्याचे अनेक पालकांनी सांगितले. यावर काही तरी मार्ग काढून शिक्षण विभागाने काेराेना काळातील फी माफ करावी, अशी मागणी हाेत आहे.
.............
फी मागणाऱ्या शाळेवर कार्यवाहीची मागणी
कारंजा : शहरातील शोभनाताई चवरे शाळेत काही विद्यार्थ्यांनी फी न दिल्यामुळे त्यांना शाळेेत बसू दिले नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळेवर कार्यवाही करावी, अशी मागणी कांरजा प्रहार व मनसे संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत नमूूद करण्यात आले. मनसेचे अमोल लुलेकर व प्रहार महेश राऊत यांनी ही तक्रार दिली. यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष शशिकांत चवरे यांना विचारणा केली असता त्यांनी असा प्रकार होत नसल्याचे सांगितले.