मंगरुळपीर तालुक्यात पहिल्याच दिवशी रामगावची शाळा बंद
By Admin | Updated: June 27, 2014 01:45 IST2014-06-27T01:41:08+5:302014-06-27T01:45:32+5:30
इचोरीतील शिक्षक गैरहजर : केंद्राधिकार्याला कारणेदाखवा

मंगरुळपीर तालुक्यात पहिल्याच दिवशी रामगावची शाळा बंद
मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यात शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी २६ जून रोजी पं.स.सभापती भास्कर शेगीकर व गटशिक्षणाधिकारी यशवंत मनवर यांनी शाळांना आकस्मिक भेटी दिल्या असता तालुक्यातील रामगाव येथील शाळा चक्क बंद होती तर इचोरी येथील जि.प.शाळेतील शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी पाच शिक्षकांची विनावेतन रजा धरण्यात आली तर केंद्राधिकार्याला कारणेदाखवा नोटीस देण्याची कारवाई करण्यात आली.
२0१४-१५ या शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला सभापती शेगीकर, गटशिक्षणाधिकारी मनवर व पं.स. च्या कर्मचारी यांनी संयुक्तपणे हिसई, मानोकी, कळंबा बोडखे व आसेगाव या चार केंद्रातील एकूण ७ शाळांना भेटी दिल्या.या शाळाभेटी दरम्यान जि.प. शाळा शहापूर, जि.प.शाळा मोतसावंगा, जि.प.प्राथमिक शाळा वसंतवाडी व बिटोडा भोयर या शाळामधील कामकाज सुरळीत सुरु होते.सर्व शिक्षक शाळेत उपस्थित होते. मात्र रामगावची जि.प.प्राथमिक शाळा चक्क कुलुपबंद होती.या शाळेचा गावाकरी मंडळीसमोर पंचनामा करण्यात आला.त्याचप्रमाणे इचोरी गावातील जि.प. प्राथमिक शाळेतील तीनही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते त्यामळे मध्यान्ह भोजनाच्या वेळी सभापती,गटशिक्षणाधिकारी,शालेय पोषण आहार अधीक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वत: खिचडी वाटप केले शाळा भेटीदरम्यान इयत्ता १ ली मये प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत े पुष्पगुच्छ देउन करण्यात आले तसेच शाळातील उणिवा दूर करण्यासाठी संबंधित शाळाच्या मुख्याध्यापकांना एक आठवडयाचा वेळ देण्यात आला.शाळा बंद असलेल्या व शिक्षक उपस्थित नसलेल्या शाळेच्या केंद्रप्रमुखांना आपल्या केंद्राअंतर्गत शाळांवर नियंत्रण ठेवले नसल्याने कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. रामगाव येथील जि.प. शाळेच्या दोन तर इचोरी येथील जि.प.शाळेच्या तीन अशा एकुण पाच शिक्षकांची एका दिवसाची विनावेतन रजा करण्यात आली आहे.याबाबत सदर शिक्षकांवर पुढील कारवाईसाठीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. वाशिम यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.