ग्रामीण भागात स्वच्छतेचा होणार गजर; चढाओढीसाठी विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:26+5:302021-09-10T04:49:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ‘हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम’ (ओडीएफ प्लस) पूर्णत्वास ...

ग्रामीण भागात स्वच्छतेचा होणार गजर; चढाओढीसाठी विविध स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ‘हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम’ (ओडीएफ प्लस) पूर्णत्वास जावा म्हणून राज्यस्तरीय घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट लेखन करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राज्यस्तरावर गौरविण्यात येणार असून, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी केले. या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेचा गजर होणार आहे.
या घोषवाक्य लेखन स्पर्धेचा उद्देश हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस)) या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकसहभाग वाढवणे हा आहे. य स्पर्धेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राज्य पातळीवर गौरव करण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त अधिक या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जसे की शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन, ओला-सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण इत्यादी विविध विषयांवर घोषवाक्य लिहायचे आहेत. या घोषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व अंतर्गत सर्व गावे सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतीने गावात झालेल्या सर्व घोषवाक्यांचे छायाचित्र एकत्रितपणे १५ सप्टेंबर २०२१पर्यंत पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना २ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात घोषवाक्य लेखन स्पर्धा होत आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक गजानन वेले यांनी केले.
००००
सार्वजनिक ठिकाणी घोषवाक्य...
ग्रामपंचायतीने गावस्तरावर सार्वजनिक जागा, बाजारपेठा, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, सार्वजनिक सभागृह आदी ठिकाणी हागणदारीमुक्त अधिक या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त घोषवाक्य लिहावीत. ही घोषवाक्य लोकजागृती व जास्तीत जास्त परिणाम करणारी असणे गरजेचे आहे. घोषवाक्यांमध्ये सांस्कृतिक तसेच तांत्रिक बाजूने योग्य सर्वसमावेशक आणि आकर्षक मजकूर असणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत.