कोरोना संसर्ग वाढूनही सॅनिटायझरची विक्री ९० टक्क्यांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:31+5:302021-03-18T04:41:31+5:30
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. मे महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ ...

कोरोना संसर्ग वाढूनही सॅनिटायझरची विक्री ९० टक्क्यांनी घटली
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. मे महिन्यापासून रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. सुरुवातीच्या काळात कोरोनापासून बचावाकरिता तोंडाला मास्क लावण्यासह हात सॅनिटायझरने वारंवार धुण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित केले. काही सजग नागरिकांच्या तर खिशातच सॅनिटायझरची शिशी ठेवली जायची. अशात सॅनिटायझरच्या अतिरिक्त वापराने हात शुष्क झाल्याच्याही तक्रारी व्हायला लागल्या. गेल्या काही महिन्यांपासून तर सॅनिटायझरचा वापर झपाट्याने घटल्याचे दिसून येत आहे.
...........
कोरोना विषाणू संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरची प्रचंड प्रमाणात मागणी होती. एप्रिल २०२० पासून काहीच महिन्यात जिल्ह्यात सॅनिटायझर विक्रीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. आता मात्र कोरोना वाढला असतानाही ९० टक्क्यांनी सॅनिटायझरची विक्री घटलेली आहे.
बाजारपेठेत विविध कंपन्यांचे सॅनिटायझर उपलब्ध आहे. मध्यंतरीच्या काळात विक्री पूर्णत: ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मात्र काही प्रमाणात ग्राहकांकडून मागणी व्हायला लागल्याने सॅनिटायझर उपलब्ध करण्यात आले.
बहुतांश नागरिक सॅनिटायझरऐवजी आता हात स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करीत असल्यानेही विक्रीत ९० टक्क्यांनी घट झालेली आहे.
............
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची विक्री वाढणार, या अपेक्षेने औषध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात ‘स्टॅाक’ केला; परंतु विक्रीत सुमारे ९० टक्के घट झाली आहे.
- राजेश पाटील शिरसाट
अध्यक्ष, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
.........
मागील वर्षी सॅनिटायझरची विक्री
५० लाख
यावर्षीची विक्री
३ लाख (३ महिन्यात)
मास्क विक्रीत
८० टक्के
झाली घट
............
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया
कोरोनापासून बचावासाठी हात वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे; मात्र सॅनिटायझरने हाताची स्कीन शुष्क पडते. त्यामुळे त्याचा वापर टाळून साबण किंवा डेटॅालने हात धुण्याचा पर्याय निवडला आहे.
- धनंजय गाभणे
............
मागील वर्षी कोरोनापासून बचावाकरिता हाताला सॅनिटायझरचा नियमित वापर केला; मात्र त्याची जणू सवयच पडली होती. यामुळे कालांतराने ‘स्कीन’च्या समस्या जाणवायला लागल्या. आताही सॅनिटायझर वापरत आहे; परंतु त्याचे प्रमाण कमी केले आहे.
- अतुलकुमार शर्मा