सहस्त्र सिंचन विहीर योजना ठरतेय ‘मृगजळ’!

By Admin | Updated: March 7, 2017 02:45 IST2017-03-07T02:45:50+5:302017-03-07T02:45:50+5:30

उद्दिष्ट सहा हजार विहिरींचे; दोन महिन्यात केवळ १२ विहिरींच्या कामांना प्रारंभ.

Sahargarh irrigation scheme plans 'Mirage'! | सहस्त्र सिंचन विहीर योजना ठरतेय ‘मृगजळ’!

सहस्त्र सिंचन विहीर योजना ठरतेय ‘मृगजळ’!

वाशिम, दि. ६- जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे, या मूळ उद्देशाने शासन स्तरावरून पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजना हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ३0 जून २0१७ पर्यंत तब्बल सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करावयाची आहेत; मात्र गत दोन महिन्यांच्या काळात त्यापैकी केवळ १२ विहिरींच्या कामांना प्रारंभ झाल्याची माहिती सूत्रांकडून सोमवारी प्राप्त झाली.
पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत २४ डिसेंबर २0१६ पर्यंत अर्ज स्वीकारून १0 जानेवारी २0१७ पर्यंत सर्वेक्षण करण्यासह १५ जानेवारीपर्यंत या विहिरींना ग्रामसभेत मान्यता मिळवून घेणे अपेक्षित होते; परंतु या प्रक्रियेतच मोठा कालावधी निघून गेला. सद्य:स्थितीत जिल्ह्यात या योजनेसाठी शेतकर्‍यांकडून १८ हजार ४४५ अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील ६ हजार ८६५ अर्ज पात्र ठरले आहेत. यासाठी सहा तालुक्यांत मिळून ३९0 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेतल्या आहेत. या योजनेंतर्गत वाशिम तालुक्यात शनिवार, ४ मार्चपर्यंत १0 विहिरींची कामे सुरू झाली; तर मानोरा तालुक्यात पात्र ठरलेल्या ४१७ अर्जांपैकी केवळ २ विहिरींची कामे सुरू होऊ शकली आहेत.
गंभीर बाब म्हणजे प्रशासनाच्या प्रयत्नांनंतरही काही ठिकाणी अद्याप ग्रामसभांचे आयोजनच करण्यात आलेले नाही. आता या योजनेसाठी प्रशासनाला राहिलेल्या ग्रामपंचायतीत ग्रामसभांचे आयोजन करण्यासह निर्धारित उद्दिष्टातील लाभार्थींची निवड करण्यासाठी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून योजना यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असताना तालुका पातळीवरून मात्र अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजनेचे उद्दिष्ट उर्वरित चार महिन्यांत पूर्ण करणे कठीण असल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्यातील वाशिम आणि मानोरा तालुक्यात १२ विहिरींच्या कामांना प्रारंभ झाला आहे. या योजनेसाठी प्राप्त अर्जातील बहुतांश अर्जांना मान्यता देण्यात आली असून, उर्वरित विहिरींनाही लवकरच सुरूवात केली जाईल.
- सुनील कोरडे
उपजिल्हाधिकारी (रोहयो), वाशिम

Web Title: Sahargarh irrigation scheme plans 'Mirage'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.